Nashik : अंजनेरी ते ब्रह्मगिरी ‘रोप-वे’चा वाद वनमंत्र्यांच्या दरबारी, पर्यावरणप्रेमी एकवटले

Nashik : अंजनेरी ते ब्रह्मगिरी ‘रोप-वे’चा वाद वनमंत्र्यांच्या दरबारी, पर्यावरणप्रेमी एकवटले

नाशिक : त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील प्रस्तावित अंजनेरी ते ब्रह्मगिरी 'रोप-वे'विरोधात पर्यावरणप्रेमी एकटवले आहेत. त्यात 'रोप-वे'च्या कंत्राटाची प्रक्रिया सुरू झाल्याने स्थानिक स्तरावरील आंदोलनानंतर थेट वनमंत्र्यांकडे दाद मागण्याचा निर्णय पर्यावरणप्रेमींनी घेतला आहे. त्यामुळे वनमंत्र्यांच्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

ब्रह्मगिरी आणि अंजनेरी पर्वताला जोडणाऱ्या ५.८ किलोमीटर अंतरावरील बहुचर्चित 'रोप-वे'चा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून ३७६ कोटींची निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. राष्ट्रीय राजमार्ग रसद प्रबंधन लिमिटेडने (एनएचएलएमएल) 'रोप-वे' प्रकल्पात पेगलवाडीनजीक मुख्य केंद्र उभारण्याचे नियोजित केले आहे. त्या ठिकाणांहून आठ टॉवर्सवरून अंजनेरी आणि २० टॉवर्सवरून ब्रह्मगिरीपर्यंत 'रोप-वे' असणार आहे. दरम्यान, नाशिकच्या पर्यावरणप्रेमींनी अंजनेरी रोप-वे प्रकल्पाला सुरुवातीपासूनच विरोध दर्शवला आहे. त्यासाठी स्थानिक स्तरावर आंदोलनेही करण्यात आली होती. त्यातच या प्रकल्पाला वनमंत्रालयाने हिरवा कंदील दर्शवल्याने हा वाद आता मंत्रालयात पोहोचला आहे. आता वनमंत्र्यांची भेट घेत या प्रकरणी दाद मागण्याची तयारी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

ब्रह्मगिरी पर्वताची पावित्र्यता, अंजनेरीची जैवविधता धोक्यात

रोप वे मुळे ब्रम्हगिरी पर्वताची पावित्र्यता व अंजनेरी पर्वताची जैवविधता धोक्यात येईल असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. अंजनेरी पर्वत परिसरात स्वच्छतादूत गिधाड पक्ष्यांचा अधिवास आहे. मानवी हस्तक्षेपाने दुर्मीळ होत चाललेल्या गिधाड प्रजातीचे संवर्धन करण्यासाठी अंजनेरी राखीव क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. येथे रोपवे झाल्यास येथील जैवविधता व गिधाडांचा अधिवास धोक्यात येईल असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. म्हणूनच रोपवे हटाव, जटायू बचाव अशी मोहिमच या पर्यावरण प्रेमेंनी सुरु केली आहे.

मात्र, तरीदेखील केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेंतर्गत पर्यटनास चालना देण्यासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी ब्रह्मगिरी अंजनेरी रोपवे प्रस्तावित केला असून, त्यासंबंधी निविदा सूचना प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे एकीकडे केंद्रशासन अंजनेरीला अभयारण्य घोषित करण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर त्याच वेळेस खासदार मात्र रोपवे तयार करून येथील पर्यावरणास हानीकारक परिस्थिती निर्माण करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींचा आहे.

ब्रह्मगिरी पर्वतावर रोपवे सुरू झाल्यास पर्वतावर जाण्यासाठी डोलीचा पारंपरिक व्यवसाय कायमस्वरूपी बंद होण्याची भीती मेटघर किल्ला ग्रामस्थांना वाटत आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news