नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यातील शिक्षणाचा हक्क कायदा अर्थात 'आरटीई' प्रवेशप्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू आहे. लॉटरीपाठोपाठ प्रतीक्षा यादीतील पालकांनी प्रवेश निश्चितीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. नाशिक जिल्ह्यात 'आरटीई' प्रवेशाच्या ३ हजार ८०५ जागांवर पालकांनी प्रवेश निश्चित केले आहे. तर १ हजार ०४९ जागा अद्यापही रिक्त आहेत. राज्यात रिक्त जागांचा आकडा २५ हजारांपेक्षा जास्त आहे. त्यातच साेमवारी (दि.१९) प्रतिक्षा यादीच्या प्रवेशासाठी अखेरची संधी असल्याने प्रक्रियेला मुदतवाढीचे चिन्हे आहेत.
सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीईअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांसाठी प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्याती ४०१ शाळांमध्ये आरटीईच्या ४ हजार ८५४ जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी २१ हजार ९२३ अर्ज प्राप्त झाले होते. लॉटरीत ४ हजार ७५० तर प्रतिक्षा यादीत १ हजार ३६८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी लॉटरीतील ३ हजार १५६ तर प्रतिक्षा यादीतील ६४९ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चित केले.
दरम्यान, लॉटरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी तीन वेळा प्राथमिक शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली होती. त्यानंतर प्रतीक्षा यादीची निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, पालकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आरटीई प्रवेशांना विलंब झाला आहे. जुलैपर्यंत आरटीई प्रवेशप्रक्रिया लांबण्याची चिन्हे आहेत.
जिल्ह्यातील प्रवेशाची स्थिती
शाळा : ४०१
उपलब्ध जागा : ४,८५४
लॉटरी निवड : ४,७५०
प्रतिक्षा यादीत निवड : १,३६८
प्रवेश निश्चित : ३,८०५
रिक्त जागा : १,०४९