वॉशिंग्टन : नासा हॅबिटेबल वर्ल्डस ऑब्झर्व्हेटरी (एचडब्लूओ) या आपल्या दुर्बिणीच्या माध्यमातून सौर मंडळाबाहेर जीवसृष्टी आहे का, याचा नव्याने शोध घेणार आहे. याच आठवड्यात कॅलिफोर्निया इन्स्ट्यिूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅल्टेच) येथे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यात एचडब्ल्यूओ या नासाच्या पुढील भव्यदिव्य दुर्बिणीच्या माध्यमातून ही मोहीम कशी राबवली जाऊ शकते, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. एचडब्ल्यूओ ही जेम्स वेबनंतर नासाचा सर्वात मोठा प्रकल्प आहे.
सौर मंडळाबाहेर जीवसृष्टी आहे का, याची आजवर बरीच उत्सुकता राहिली आहे. पण, त्या तुलनेत संशोधनाचे प्रयत्न अत्यल्प रहात आले आहे. या पार्श्वभूमीवर, नासाने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलण्यासाठी पुरेपूर तयारी केली आहे. सरतेशेवटी, पृथ्वीच्या आकाराचे काही अब्ज ग्रह वसलेले असू शकतात, असा नासाचा अंदाज आहे. द्रवरूप पाण्याच्या अस्तित्वासाठी तेथे अनुकूल तापमान असेल, असे त्यांचे मत आहे.
या पार्श्वभूमीवर, शास्त्रज्ञांनी याबाबत अधिक विस्तृत अभ्यासासाठी एचडब्लूओच्या माध्यमातून नव्याने अभ्यासाची मोहीम आखली आहे. नासाचे एक्सप्लोनेट एक्स्प्लोरेशन प्रोग्रॅमचे मुख्य तंत्रज्ञ निक सिएग्लर म्हणतात, 'या एक्स्प्लोनेटवरील वातावरणाचा आम्हाला सखोल अभ्यास करायचा आहे. तेथे ऑक्सिजन, मेथॅन, पाण्याचा अंश आणि अन्य रसायने आहेत का, जे जीवसृष्टी असण्याचे संकेत देऊ शकतात, यावर आमचा मुख्य भर असणार आहे. आम्ही अगदी एखादी हिरव्या-गडद रंगाची व्यक्ती तेथे आढळून येईल, असे म्हणत नाही. पण, जीवसृष्टीसाठी आवश्यक घटक तेथे आहेत का, यावर निश्चितपणाने लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे'.
अॅस्ट्रॉनॉमी व अॅस्ट्रॉफिजिक्स 2020 या डिकेडल सर्व्हेमध्ये एचडब्ल्यूओची प्राधान्यक्रमाने शिफारस करण्यात आली होती. पुढील दशकभरातील अॅस्ट्रॉनॉमीतील महत्त्वाची ध्येये, उद्दिष्ट्ये काय असतील, याचा यात आढावा घेण्यात आला होता. सौर मंडळाबाहेरील जीवसृष्टीचा शोध आणि त्याचबरोबर अॅस्ट्रॉनॉमर्सना पूर्ण ग्रहीय मंडळ व्यवस्थित उमजून घेता यावे, तसेच अॅस्ट्रस्फिजिक्स संशोधनात याचे महत्त्वपूर्ण योगदान असावे, असाही यामागील विशिष्ट द़ृष्टिकोन आहे.
आता ही मोहीम 2030 च्या उत्तरार्धात किंवा 2040 च्या प्रारंभिक टप्यात प्रत्यक्षात राबवली जाणार असली तरी आता या दुर्बिणीसाठी जे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते, त्याचा भविष्यातील वाढता खर्च निश्चितपणाने रोखता येणार आहे, असे एचडब्ल्यूओ टेक्निकल असेसमेंट ग्रुपचे सदस्य दिमित्री मवेत यांनी म्हटले आहे.