नाशिक : शानदार रोड शो पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट रामकुंडावर पोहचले. रामकुंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. रामकुंडावर गोदावरीचे जलपूजन केल्यानंतर पंतप्रधान मोदी हे नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात पोहचले. याठिकाणी पुजाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी मंदिराला फेरीही मारली. यानंतर मोदींच्या हस्ते श्री काळारामाचे आरती व पूजन करण्यात आले. यावेळी पौरोहित्य महंत सुधीरदास पुजारी यांनी केले. यावेळी नरेंद्र मोदी हे भजनात दंग झाल्याचे पाहायला मिळाले.
काळाराम मंदिरातील पूजाविधी आटोपल्यानंतर, पंतप्रधान मोदी हे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्य़ा उद्घाटनासाठी रवाना होत आहे. याठिकाणी ते युवकांना संबोधित करतील. यावेळी मोदी काय बोलतील? याकडे नाशिकसह अवघ्या देशाचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, 22 जानेवारीला अयोद्धेत होत असलेल्या राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या नाशिक दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मोदींनी ज्याठिकाणी प्रभु रामचंद्राचे वास्तव्य राहिले अशा पंचवटीतील काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन आरती देखील केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी देखील 22 जानेवारीला आपण काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याचे म्हटले होते, त्याआधीच मोदी हे रामभूमीत आले आणि त्यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतल्याने राजकीय चर्चांना देखील उधान आले आहे.