Nandurbar Lok Sabha Election | नंदुरबारला इतिहासात पहिल्यांदाच झाले विक्रमी मतदान

Nandurbar Lok Sabha Election | नंदुरबारला इतिहासात पहिल्यांदाच झाले विक्रमी मतदान

नंदुरबार पुढारी वृत्तसेवा- सार्वत्रिक निवडणूक 2024 चे नंदुरबार लोकसभा मतदार संघात एकूण 70.68 टक्के मतदान झाले असून नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या इतिहासातील हे सर्वाधिक मतदान झाले आहे. भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांची बूथ वरील लढाई रंगतदार झाली असल्याचा अंदाज यावरून लावला जात आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा देशातील पहिल्या क्रमांकाचा मतदार संघ गणला जातो. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी वसलेला अतिदुर्गम भाग आणि गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेश या तीन राज्यांच्या सीमा जिथे मिळतात त्या सीमावर्ती भागात वसलेला नंदुरबार जिल्हा, हे नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या भौगोलिक रचनेचे वैशिष्ट्य असून एकट्या आदिवासींचे म्हणजे अनुसूचित जमातींचे जवळपास 11 लाख इतके मतदार आहे. यामुळे ही वोटबॅंक जिकडे झुकेल त्याचा विजय निश्चित मानला जातो. येथील निवडणूक रिंगणात एकूण 11 उमेदवार असले तरी खरा सामना भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान खासदार डॉक्टर हिना विजयकुमार गावित आणि काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्यात रंगला. ऐतिहासिक म्हणावे इतके मोठे मतदान झाले असल्यामुळे भाजपा आणि काँग्रेस समर्थक मतदारांनी चुरस रंगवली असावी असा अंदाज लावला जात आहे.

13 लाख 92 हजार 710 मतदारांनी बजावला हक्क

दरम्यान, या मतदारसंघात एकूण मतदार संख्या 19 लाख 70 हजार 327 असून काल सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत झालेल्या मतदानात तब्बल 70.68% मतदारांनी म्हणजे 13 लाख 92 हजार 710 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापासून आतापर्यंत झालेल्या निवडणुकीतील हे सर्वाधिक मतदान आहे. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, साक्री आणि शिरपूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी नवापूर विधानसभा क्षेत्रात चक्क 80.18 टक्के मतदान झाले असल्यामुळे उच्चांकी मतदान करणारा विधानसभा मतदारसंघ म्हणून नवापूर मतदारसंघाचा उल्लेख करता येईल. त्या खालोखाल धडगाव अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागाचा समावेश असलेल्या अक्कलकुवा या विधानसभा क्षेत्रातील आदिवासी मतदारांनी 75.01 टक्के इतके मतदान केले. अन्य विधानसभा मतदार संघनिहाय मतदान याप्रमाणे : शहादा- 71.49 टक्के, नंदुरबार- 66.67 टक्के, साक्री- 67.60 टक्के, शिरपूर- 65.05 टक्के.

हेही वाचा –

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news