Nanded Civil Hospital News : नांदेड मृत्यू प्रकरणावरून सरकार ‘ॲक्शन मोड’ वर

Nanded Civil Hospital News
Nanded Civil Hospital News
Published on
Updated on

नांदेड/मुंबई; विशेष प्रतिनिधी : येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यू प्रकरणानंतर राज्य सरकार 'अ‍ॅक्शन मोड'वर आले आहे. राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांतील औषध खरेदी स्थानिक पातळीवरच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांना जिल्हाधिकार्‍यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी दिले. दरम्यान या रुग्णालयात बुधवारी मध्यरात्रीनंतर आणखी 14 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये चार बालकांचा समावेश आहे.

दुसरीकडे नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील मायलेकीच्या मृत्यूप्रकरणी या रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शामराव वाकोडे यांच्यासह बालरोग तज्ज्ञ विभागातील डॉक्टरांवर गुरुवारी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या आठ दिवसांत तब्बल 89 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात 38 बालकांचा समावेश असल्याची माहिती गुरुवारी अधिकृतपणे देण्यात आली.

नांदेड व अन्य शासकीय रुग्णालयांतील मृत्यूची मालिका माध्यमांमध्ये गाजल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याची गंभीर नोंद घेत स्वतःहून दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड रुग्णालयाने जिल्हा प्रशासनाकडे 27 सप्टेंबरपासूनच्या मृत्यूंचा तपशील सादर केला. एक ऑक्टोबर रोजी 12 बालकांसह 24 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या तीन दिवसांत 29 जण दगावले. रुग्ण मृत्यू प्रकरणामुळे नांदेडच्या शासकीय रुग्णालयाची चर्चा राजधानी दिल्लीपर्यंत गेली. सामान्यपणे या रुग्णालयातील मृत्यूचे प्रतिदिन प्रमाण 11 आहे. तथापि, एकाच दिवशीच्या 24 मृत्यूनंतर शासन आणि आरोग्य विभागावर टीका सुरू झाली.

वैद्यकीय शिक्षण संचालक नांदेडमध्ये तळ ठोकून

हे प्रकरण राज्यभर गाजत असताना शासकीय रुग्णालयातील बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागात रुग्णांचा ओघ कायम आहे. सध्या येथे 780 रुग्ण भरती आहेत. गेल्या 24 तासांत 170 नव्या रुग्णांची भर पडली आहे. या कालावधीत 38 मोठ्या तर 13 लहान शस्त्रक्रिया पार पडल्या. तसेच 25 महिला प्रसूत झाल्या.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर सलग तिसर्‍या दिवशी नांदेडमध्ये तळ ठोकून आहेत. शासनाने नियुक्त केलेली त्रिसदस्यीय समिती आपले कामकाज आटोपून छत्रपती संभाजीनगरला रवाना झाली. या समितीच्या अहवालातील तपशील बाहेर आलेला नाही. रुग्णालयात पुरेसा औषध साठा उपलब्ध असून, सर्व डॉक्टर्स व रुग्णालय प्रशासन सज्ज असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गणेश मनूरकर यांनी स्पष्ट केले आहे.

…तरीही मायलेकीचा मृत्यू

दरम्यान, मायलेकीच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. वाकोडेंविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी तक्रार शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास नकार दिला होता. त्यानंतर कंधार तालुक्यातील कामाजी टोम्पे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी अंजली वाघमारे 30 सप्टेंबर रोजी प्रसूतीसाठी या रुग्णालयात दाखल झाली होती. तिची नॉर्मल प्रसूती झाली. त्यावेळी आईसह बाळाची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, दोन दिवसांनी आई आणि बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगून डॉक्टरांनी रक्ताच्या पिशव्यांसह अन्य औषधे मागवली. एवढे करूनही शनिवारी बाळाचा मृत्यू झाला. पाठोपाठ अतिरक्तस्रावामुळे बुधवारी अंजली यांचाही मृत्यू झाला. याला अधिष्ठाता जबाबदार असल्याचा आरोप टोम्पे यांनी केला आहे. या मायलेकींना डॉक्टरांची गरज असताना डॉ. वाकोडे यांनी डॉक्टर उपलब्ध करून दिले नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.

गरिबांच्या मृत्यूचे मोल नाही; राहुल गांधींचा केंद्रावर निशाणा

नांदेडमधील सरकारी रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारला गरिबांच्या जीवाचे मोल नाही. या मृत्यूंना जबाबदार कोण, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले पाहिजे, असे ट्विट राहुल यांनी गुरुवारी केले. महाराष्ट्र सरकारदेखील या मृत्यूंबद्दल बेफिकीर असल्याचा आरोप त्यांनी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news