लोहा, हिमायतनगर; पुढारी वृत्तसेवाः नांदेड जिल्ह्यात परतीच्या पावसाने कहर माजविला असून मागील अनेक दिवसांपासून विजेचा कडकडाट अनेकांच्या मृत्यूचे कारण बनला आहे. मंगळवारी (दि.18) लोहा तालुक्यातील धावरी येथे वीज कोसळून ३ ऊसतोड कामगार ठार झाले. तर एक 17 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर नांदेड येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या घटनेत हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा येथे वीज कोसळून वारंगटाकळी एक शेतकरी ठार झाला असून एक शेतकरी जखमी झाला आहे.
धावरी येथील शेतकरी केशव भिमराव वाकोडे व संजय किशन पवार यांच्या शेतात ऊसतोड मजूर काम करीत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. कंधार तालुक्यातील पानभोसी येथील माधव पिराजी डुबुकवाड (वय 50) पूजा माधव डूबूकवाड (वय 17) पेठपिंपळगाव येथील पोचीराम शामराव गायकवाड (वय 52), रुपाली पोचीराम गायकवाड (वय 16) यांच्यावर वीज कोसळली. या दुर्घटनेत माधव डुबुकवाड, पोचीराम गायकवाड, रूपाली गायकवाड हे जागीच ठार झाले. पूजा ही गंभीर जखमी झाली. तिला नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले आहे. लोहा येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी तहसीलदार व्यंकटेश मुंडे, पोलीस निरीक्षक संतोष तांबे, प्राचार्य राजेंद्र भोसीकर दाखल होत पाहणी केली.
दुसऱ्या घटनेत हिमायतनगर शहरासह तालुक्यात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास मेघगर्जना व वादळी वार्यासह जोरदार पाऊस झाला. सिबदरा येथे सोयाबीन काढणीसाठी गेलेल्या दोन शेतकर्यांवर वीज कोसळली. यात वारंगटाकळी येथील 34 वर्षीय शेतकरी सुनील साहेबराव वायकोळे हे जागीच ठार झाले. तर गजानन टोकलवाड हे गंभीर जखमी झाल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकर्यांनी दिली.
हेही वाचलंत का ?