आकाशगंगेतील १३ अब्ज वर्षांपूर्वीच्या तार्‍यांना ‘शिव-शक्ती’ नाव

आकाशगंगेतील १३ अब्ज वर्षांपूर्वीच्या तार्‍यांना ‘शिव-शक्ती’ नाव

वॉशिंग्टन : आपल्या 'मिल्की वे' नावाच्या आकाशगंगेच्या मध्यभागी अत्यंत प्राचीन अशा तार्‍यांचे दोन गट आढळून आले आहेत. हे तारे तब्बल 13 अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत. खगोलशास्त्रज्ञांनी त्यापैकी एका गटाला 'शिव' तर दुसर्‍या गटाला 'शक्ती' असे नाव दिले आहे. हे तारे म्हणजे 'मिल्की वे'च्या निर्मितीमधील सुरुवातीचे 'बिल्डिंग ब्लॉक्स' असावेत, असे संशोधकांना वाटते.

मिल्की वेमधील अशा विशेष तार्‍यांच्या गटांना यापूर्वी कधीही पाहण्यात आले नव्हते. प्रत्येक गटाच्या प्रवाहात अनेक तारे असून, त्यांचे वस्तुमान आपल्या सूर्याच्या 1 कोटी पट अधिक आहे. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर अस्ट्रॉनॉमीच्या संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले आहे. त्याची माहिती 'द अस्ट्रोफिजिकल जर्नल' मध्ये देण्यात आली आहे. या दोन रचनांना 'शिव' आणि 'शक्ती' अशी नावे देण्यात आली आहेत. सुरुवातीच्या काळातील 'मिल्की वे' मध्ये या दोन रचना 12 अब्ज ते 13 अब्ज वर्षांपूर्वीच्या काळात सामावून गेल्या.

त्यामुळे आपल्या आकाशगंगेच्या विस्ताराला चालना मिळाली. मॅक्स प्लँक इन्स्टिट्यूट फॉर अस्ट्रॉनॉमीमधील याबाबतचे संशोधन करणार्‍या संशोधिका ख्याती मल्हान यांनी याबाबतची माहिती दिली. त्या म्हणाल्या, या तार्‍यांच्या जन्मापासून आतापर्यंत मिल्की वे इतकी बदलली आहे, की या तार्‍यांना एक समूह म्हणून आपण सहजपणे ओळखू शकत नाही. युरोपियन स्पेस एजन्सीच्या गैया स्पेस टेलिस्कोपच्या साहाय्याने या दोन रचना शोधून काढण्यात आल्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news