नागपूर, पुढारी वृत्तसेवा : नागपुरात एक १७ वर्षीय मुलगी गर्भवती होती. पाच महिने झाल्यानंतर ही बाब तिच्या लक्षात आली. त्यानंतर तिने युट्यूबवर व्हिडीओ पाहून गर्भपात केला. पण, प्रकृती खराब झाल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
नागपूर तालुक्यातील एका गावातीव हे प्रकरण आहे. सतरा वर्षीय मुलीचे एका २७ वर्षीय युवकासोबत सूत जुळले होते. दोन वर्षांपासून त्याचे प्रेम प्रकरण सुरू असल्याची माहिती आहे. वर्षभरापूर्वी तो युवक नागपुरात कामानिमित्त आला. एमआयडीसी परिसरात भाड्याने खोली करून राहू लागला.
त्यामुळे त्यांच्या भेटीगोटी कमी झाल्या. पण, तरीही ते संधी मिळेल तेव्हा भेटत होते. कधी-कधी हा युवक नरखेडला जात असे, तर कधी-कधी ती नागपूरला येत असे. काही दिवसांपूर्वी ती नागपूरला आली. रात्री त्याच्या खोलीवर थांबली. दोन-तीन दिवस ती इकडं थांबली होती. त्यावेळी त्यांच्यात शरीरसंबंध निर्माण झाले. यातून तिला गर्भधारणा झाली. मळमळ, उलटीचा तिला त्रास होऊ लागला, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गर्भधारणा झाल्याची बाब मुलीच्या लक्षात आल्यानंतर तिने युवकाला सांगितले. तो रुग्णालयात काम करत असल्याने त्याने काही औषधे तिला सांगितली. तिने ती औषध खाल्ली पण, काही परिणाम झाला नाही. चार-पाच महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर ती हादरली. आता काय करावे तिला काही सुचेना. गर्भपात कसा करतात, यासाठी तिने युट्युबवर काही व्हिडीओ पाहिले.
त्यात मुलीला काही गावरानी औषधांची माहिती मिळाली. तिने काढा तयार केला आणि तो घेतला. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. घरी मुलगी बेशुद्ध पडली होती. बाजूला चार-पाच महिन्यांचे अर्भक होते. पालकांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. नागपूर ग्रामीण पोलिसांना प्रकरणाची माहिती देण्यात आली. युवकाविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण पोलिसांनी हे प्रकरण आता एमआयडीसी पोलिसांकडे वर्ग केले. पोलीस तिच्या प्रियकराचा शोध घेत आहेत.
हे वाचलंत का?