पुढारी ऑनलाईन: आझाद हिंद सरकार हे अखंड भारताचे पहिले स्वदेशी सरकार होते. त्यामुळे अखंड भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू नसून 'सुभाषचंद्र बोस' असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. भारतीय शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या 'शोधवीर समागम'च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 21 ऑक्टोबर 1943 रोजी आझाद हिंद सरकार स्थापन करत, पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यामुळे खऱ्या अर्थाने अखंड भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू नसून थोर सेनानी सुभाषचंद्र बोस असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र नेताजी सुभाष यांच्या स्वप्नातील भारत आपण घडवू शकलो नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्वातंत्र्यानंतर देशातील सत्ता अशा लोकांकडेच राहिली ज्यांना ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळूनही त्या गुलामगिरीतून बाहेर पडता आले नाही. पुढे ते म्हणाले की, अलीकडेच भारतीय नौदलाचे इंग्रजी फलकही बदलण्यात आले आहेत. भारतीय युद्धनौकांवर आता सेंट जॉर्ज क्रॉस नाही तर शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रेरित करणारे चिन्ह असल्याचेही ते म्हणाले.
एक काळ होता की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाला जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले जायचे. त्यांना इतर नेत्यांच्या तुलनेत कमी लेखले जायचे. त्यांच्याशी संबंधित अनेक घटना आणि कागदपत्रे लोकांसमोर आणण्याची गरज होती, पण ते जाणीवपूर्वक टाळले गेल्याचेही सिंह म्हणाले. पण आता देशात नेताजींचा पुन्हा सन्मान होत आहे, ज्याचे ते हक्कदार आहेत. नेताजींसंबंधित ३०० हून अधिक दस्तऐवजी आमच्या सरकारने सार्वजनिक केले. जे बरेच काळापासून सार्वजनिक करण्यात आले नव्हते.