![N D Mahanor](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F08%2FCopy-of-Untitled-Design-8.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्येष्ठ साहित्यिक, रानकवी ना. धों. महानोर यांनी ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (poet, lyricist Namdeo Dhondo Mahanor passes away) ना. धों. महानोर यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पळसखेड या गावी १६ सप्टेंबर १९४२ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाले. मराठी साहित्य क्षेत्रात ते निसर्गकवी म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या कवितांवर बालकवींचा प्रभाव राहिला. (N D Mahanor)
ना. धों. महानोर यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध जपला. ना. धों. महानोरांचे 'पानझड', 'तिची कहाणी' 'पळसखेडची गाणी म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना. त्यांच्या 'रानातल्या कवितां'ना खरा मातीचा गंध येतो. झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवरील नक्षत्रांचे देणे या प्रसिद्ध कार्यक्रमासाठी विंदा करंदीकर आणि ना.धों. महानोर यांच्या गीतरचना गायल्या गेल्या त्या शशांक पोवार याने संगीतबद्ध केल्या होत्या.
देवकी पंडित यांनी महानोरांनी लिहिलेली काही चित्रपट गीते गायली आहेत, ती अशी, जाळीमधी झोंबतोया गारवा (कवी -ना.धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट – एक होता विदूषक, सहगायक – रवींद्र साठे), तुम्ही जाऊ नका हो रामा (कवी-ना.धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट-एक होता विदूषक, सहगायक-आशा भोसले), सूर्यनारायणा नित् नेमाने उगवा (कवी-ना. धों. महानोर, संगीत – आनंद मोडक, चित्रपट – एक होता विदूषक), श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारा कवी ना. धों. महानोर यांची लावणी 'श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना' ही आशा भोसले यांनी 'एक होता विदूषक' या चित्रपटासाठी गायली. ती प्रचंड गाजली.
शेती आणि साहित्य क्षेत्रात यशस्वी मुशाफिरी करत असताना त्यांनी विधिमंडळात आमदार म्हणूनही प्रतिनिधित्व केलं. ते १९७८ साली त्यांची राज्यपाल नियुक्त महाराष्ट्र विधान परिषदेचे नियुक्त सदस्य झाले. कला आणि शेती क्षेत्रातुन त्यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती.
हेही वाचा