संडे स्‍पेशल : परभणीत रहस्यमय ‘वालूर बारव’

रहस्यमय वालूर बारव
रहस्यमय वालूर बारव
Published on
Updated on

परभणी, प्रवीण देशपांडे : देशात आणि राज्यात पुरातन, ऐतिहासिक आणि वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम रचना असलेल्या शेकडो बारव आढळून येतात. पण परभणी जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील वालूर या गावी असलेली बारव ही तिच्या बांधकाम वैशिष्ट्यामुळे केवळ देशातीलच नव्हे तर जगातील एकमेवाद्वितीय बारव ठरावी. आठ बाजूंनी गोलाकार फिरत बारवाच्या तळापर्यंत जाणार्‍या पायर्‍या आणि या पायर्‍यांच्या सुरुवातीला बांधण्यात आलेल्या आठ देवकोष्टमुळे (ओसर्‍या किंवा देवळी) ही बारव अन्य बारवांच्या तुलनेत 'मुलखावेगळी' ठरते.

वालूरची पुरातन पार्श्वभूमी!

वालूर या गावाला आणि एकूणच या परिसराला प्राचीन पुरातन अशी पार्श्वभूमी आहे. अशी आख्यायिका सांगितली जाते की, महर्षी वाल्मिकी यांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती. तपश्चर्येच्या दरम्यान वाल्मिकींच्या अंगावर वारूळ वाढत गेले. त्यावरून या गावाला सुरुवातीला वारूळ असे नामाभिधान प्राप्त झाले. कालांतराने त्याचाच अपभ्रंश होऊन गावाला वालूर हे नाव मिळाल्याचे पुरातन दाखले मिळतात. शिवाय या भागाला नाथ संप्रदायाची आणि पर्यायाने तंत्रविद्येचीही प्राचीन परंपरा असल्याचेही ऐतिहासिक दाखले आहेत.

याच वालूर गावाच्या जवळपास मध्यभागी ही प्राचीन बारव आहे. ही बारव किती प्राचीन आहे त्याचे ऐतिहासिक दाखले उपलब्ध नाहीत. पण या बारवच्या बांधकाम शैलीनुसार आणि वैशिष्ट्यपूर्ण रचनेनुसार सुमारे एक ते दीड हजार वर्षांपूर्वी या बारवचे बांधकाम करण्यात आले असण्याची शक्यता पुरातत्त्व खात्याने व्यक्त केलेली आहे. गेल्या वर्षीपर्यंत ही बारव पूर्णपणे दुर्लक्षित होती आणि ग्रामस्थांच्या जणू काही विस्मृतीत गेली होती. बारवभोवती अनेक झाडेझुडपे उगवून बारव जशी काही कचर्‍याने भरून गेली होती; मात्र परभणी जिल्ह्यात बारव संवर्धन अभियान सुरू झाले आणि या बारवला जणू काही पुनर्जन्मच मिळाला. बारव संवर्धन समितीचे मल्हारीकांत देशमुख, वारूलचे सरपंच संजय साडेगावकर, शैलेश तोष्णीवाल, दत्ताभाऊ राख, मारोतराव बोडखे, गणेश मुंढे, सन्ना अन्सारी यांच्यासह तमाम गावकर्‍यांनी श्रमदानातून या बारवची स्वच्छता केली आणि प्राचीन, पुरातन, वैशिष्ट्यपूर्ण आणि काहीसा गूढ स्वरूपाच्या बांधकामाचा एक जगावेगळा नमुना संपूर्ण जगापुढे आला.

तंत्रविद्येचा प्रभाव!

या बारवच्या बांधकामात आठ या संख्येला फार महत्त्व दिलेले दिसते. आठ बाजूने बारवात उतरणार्‍या पायर्‍या, आठ देवकोष्ट, पायर्‍यांची 72 आणि 118 अशी संख्या या बाबी विचारात घेता या बारवच्या बांधकामावर तंत्रविद्येचा प्रभाव पडल्याचे जाणवते. बारवमध्ये आढळून येणारे आठ देवकोष्ट हे अष्टभैरव, अष्ट जलदेवता, अष्टांगसिद्धी अशापैकीच कशाचे तरी प्रतीक असाव्यात, असेही मानण्यात येते. या भागाला नाथ संप्रदायासह तंत्रविद्येची लाभलेली प्राचीन परंपरा विचारात घेता तंत्रविद्येच्या प्रभावातून या बारवचे बांधकाम झाले असण्याची शक्यता पुरातत्त्व खात्याने व्यक्त केलेली आहे.

एकमेवाद्वितीय बारव!

देशात आणि राज्यात अनेक प्राचीन बारव आढळून आल्या असल्या तरी वालूर या गावातील बारवमध्ये आढळून आलेली वैशिष्ट्यपूर्ण रचना अन्य कोणत्याही बारवमध्ये आढळून येत नाही. या बारवची गूढ रचना आणि तंत्रविद्येची पार्श्वभूमी विचारात घेता देशातील इतिहास संशोधकांच्या द़ृष्टीने या बारवचा इतिहास उलगडणे आव्हानात्मक ठरणार आहे.

रहस्यमय बांधकामाचे कुतूहल!

या बारवचा आकार नदीतील पाण्याच्या भोवर्‍याप्रमाणे फिरत्या स्वरूपाचा भासतो. 32.2 फूट लांब, 30.8 फूट रुंद आणि 32 फूट खोलीची ही बारव आहे. चक्राकार पद्धतीने फिरत फिरत आठ बाजूने बारवाच्या तळाशी जाणार्‍या दगडी पायर्‍या आहेत. दोन टप्प्यात खाली उतरणार्‍या या पायर्‍यांची संख्याही 72 आणि 118 अशा दोन टप्प्यांत विभागली गेली आहे. ज्या आठ बाजूंनी या पायर्‍यांची सुरुवात होते, त्याच्या सुरुवातीलाच आठ देवकोष्ट (ओसर्‍या किंवा देवळी) आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news