कागल; पुढारी वृत्तसेवा : "आज मला ईडी समोर हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. या संदर्भात माझे वकील ईडीकडून मुदत घेतील," अशी माहीती राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. घरावर ईडीने दुसर्यांदा छापा टाकल्यापासून मुश्रीफ हे नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरू असतानाच आज सकाळी दहा वाजता ते कागल येथील निवासस्थानी पोहचले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी मुश्रीफ म्हणाले की, "ईडीचे अधिकारी आले तेव्हा मी इथे नव्हतो, दोन दिवस बाहेर होतो. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मला समन्स बजावलं होतं. कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आज आलो आहे. मी माझ्या वकीलांना मुदत घ्यायला सांगितलं आहे. एक महिन्याची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी वकील करणार आहेत. ईडीची आजपर्यंत नोटीस नव्हती, बाकीचा सर्व तपशील ईडीला देवू," असे मुश्रीफ यांनी सांगितले.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासदांवरून झालेल्या तक्रारीनंतर मुश्रीफ यांची ईडीने चौकशी केली. 11 जानेवारी व 11 मार्च रोजी त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला. 11 जानेवारीच्या छाप्यानंतर हसन मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयासह घोरपडे कारखान्याशी संबंधित दोन शाखांवर ईडीने छापे टाकले होते. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांसह अन्य अधिकार्यांना चौकशीसाठी मुंबईला नेले होते. बँकेतून घोरपडे कारखान्याशी संबंधित काही कागदपत्रे ताब्यात घेतली होतीत. त्याचप्रमाणे साखर कारखान्यांना दिल्या जाणार्या कर्जाची कागदपत्रे असलेली बँकेतील खोली ईडीने सील केली आहे.