वाराणसी; वृत्तसंस्था : दिवाळीचा उत्सव साजरा करताना वाराणसीत मुस्लिम महिलांच्या एका गटाने प्रभू श्रीरामाची आरती करून आगळा आदर्श साकार केला. या महिलांनी अशा प्रसंगामुळे प्रभू श्रीराम आमचे पूर्वज होते. नाव आणि धर्म बदलला म्हणून पूर्वज कसे बदलतील, असा प्रश्न करीत अशा सणांमुळे हिंदू व मुस्लिम एकतेचे दर्शन घडते, असे म्हटले आहे.
चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले तो सण दिवाळी म्हणून भारत साजरा करतो. वाराणसीच्या विशाल भारत संस्थानच्या वतीने रविवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात मुस्लिम महिला फौंडेशनच्या वतीने श्रीरामाची आरती करण्यात आली. फौंडेशनच्या नाझनीन अन्सारी म्हणाल्या की, अशा कार्यक्रमांमुळे हिंदू आणि मुस्लिम भारतीय संस्कृतीशी एकरूप होतात. मुस्लिम असून आरती केल्याबाबत आश्चर्य व्यक्त करण्याचे कारण नाही, असे सांगून नाझनीन अन्सारी म्हणाल्या की, प्रभू श्रीराम आमचे पूर्वज होते. नाव आणि धर्म बदलला म्हणून पूर्वज कसे बदलतील? उलट प्रभू रामाची आरती करून केवळ हिंदू आणि मुस्लिमांतील दरीच कमी होते असे नव्हे तर इस्लामही सहिष्णू असल्याचा संदेश जातो.
अन्सारी पुढे म्हणाल्या की, अन्यायरूपी अंधकार दूर करण्याचे सामर्थ्य प्रभू श्रीरामात होते. श्रीरामाचे नाव जगभर पोहोचवण्याच्ी आज गरज आहे. आज इस्रायल आणि पॅलेस्टाईन एकमेकांचे रक्त सांडत असताना त्यांनीही प्रभू श्रीरामाचे आचरण केल्यास जगात नक्कीच शांतता नांदेल.