पुणे : पुढारी वृत्तसेवा : लष्कराच्या ग्रुप सी विभागातील भरतीसाठी सुरु असलेल्या लेखी परिक्षेत कॉपी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक डिवाईसचा वापर करणार्या हरियाणाच्या मुन्नाभाईला येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अमन रामेश्वरम सिंग (वय 22, रा. चित्तर, जीद, हरियाना) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी नाईक सुभेदार प्रदिप शिंदे यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार खडकी येथील बी ई जी स्पोर्टस कॉम्लेक्समध्ये रविवारी दुपारी तीन वाजता घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या ग्रुप सी विभागाकरीता डिफेन्समध्ये रिक्रुट इंग्लायमेंट मुख्यालय डिफेन्स मिलिटरी जनरल स्टॉफ ड्युटी देहुरोड येथे भरती करण्यात येणार आहे. त्याची लेखी परिक्षा खडकी येथील स्पोर्ट कॉम्लेक्समध्ये रविवारी होती. यावेळी अमन सिंग याने इलेक्ट्रॉनिक डिवाईस लपवून परिक्षा केंद्रात प्रवेश केला. परिक्षा सुरु असताना त्याच्याकडे कॉपी करण्याकरीता इलेक्ट्रॉनिक डिवाइस मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याला गुन्हा करण्यासाठी कोणी मदत केली, या गुन्ह्यात कोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलिस उपनिरीक्षक एन पाटील करत आहे.
लष्कराच्या ग्रुप सी विभागाकरीच्या लेखी परिक्षेच्या भरतीसाठी अमन सिंग हरियाणातून पुण्यात आला होता. त्याने त्याच्याजवळ एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस ठेवला होता. त्या आधारे तो उत्तरपत्रिका सोडविण्याच्या तयारीत असताना ही गोष्ट केंद्रावरील पर्यवेक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्याचे हे कॉपी प्रकरण समोर आले. त्याला आता ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
– बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, येरवडा पोलिस ठाणे.