Municipal Elections Satara : नगरपंचायतींच्या 24 वॉर्डांत निवडणुकीला ब्रेक

Municipal Elections Satara : नगरपंचायतींच्या 24 वॉर्डांत निवडणुकीला ब्रेक
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा : Municipal Elections Satara : जिल्ह्यातील खंडाळा, लोणंद, कोरेगाव, वडूज, दहिवडी, पाटण या 6 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणूक कार्यक्रम सुरू असतानाच न्यायालयाने नागरिकांचा इतर मागास प्रवर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण रद्द केल्यामुळे या नगरपंचायतींच्या 24 वॉर्डांची निवडणूक स्थगित झाली आहे.

आरक्षण राहणार की जाणार, या द्विधावस्थेत असलेल्या भावी नगरसेवकांची चिंता वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील नगरपंचायतींच्या निवडणुका सुरु आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत.

Municipal Elections Satara : ग्रामपंचायत निवडणुकांचा मोठा टप्पा पुढील वर्षी

ग्रामपंचायत निवडणुकांचा मोठा टप्पा पुढील वर्षी आहे. अशा परिस्थितीत नागरिकांचा इतर मागास प्रवर्गाचे 27 टक्के असलेले राजकीय आरक्षण न्यायालयाने स्थगित केले आहे. त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी जागांवर होणार आहे.

मात्र सध्या सुरु असलेल्या नगरपंचायत निवडणूक रिंगणात उतरलेल्या अनेक इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे. नगरपंचायतींची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीवेळीही ओबीसी जागा कमी झाल्या. चार टक्क्यांवर येणारा अपुर्णांक विचारात घेवून जिल्हा प्रशासनाने प्रत्येक नगरपंचायतींमध्ये ओबीसींच्या 5 जागा निश्‍चित केल्या. त्याप्रमाणे आरक्षणाचा कोटा जाहीर करुन सोडत काढण्यात आली.

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींची निवडणूक जाहीर झाली पण…

मात्र चार टक्क्यानंतर येणारा पुर्णांक घ्यायचा नाही. पुर्णांक घेवून जागा निश्‍चित करण्याच्या सुचना आल्यानंतर ओबीसी आरक्षणासाठी फेर आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींची निवडणूक जाहीर झाली. जिल्ह्यातील कोरेगाव, पाटण, वडूज, दहिवडी, लोणंद, खंडाळा या नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.

मात्र उमेदवारी अर्ज भरत असतानाच सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे नगरपंचायतींच्या ओबीसी आरक्षित 24 जागांवरील निवडणुकांना ब्रेक लागला आहे.

निवडणूक जाहीर झालेल्या 6 नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी 4 जागा ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरु असतानाच ओबीसी जागा वगळून उर्वरित ठिकाणी निवडणूक लागली. ओबीसी जागांवरील निवडणूक होणार का, निवडणूक कधी होणार याची उत्सुकता इच्छुकांना लागली आहे.

निवडणुकीत मोर्चेबांधणीही करण्यात आली मात्र…

राजकीय पक्षांनी आपापले पॅनेल उभे करुन उमेदवारही घोषित केले आहेत. या निवडणुकीत मोर्चेबांधणीही करण्यात आली. मात्र निवडणूक लांबणीवर पडण्याची चिन्हे असल्याने भावी नगरसेवकांना चिंता सतावू लागली आहे.

मेढा नगरपंचायतीचीही निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यामुळे या नगरपंचायतीमध्ये असणार्‍या ओबीसींच्या 4 जागांचाही प्रश्‍न निर्माण होणार आहे. म्हणजेच जिल्ह्यातील नगरपंचायतींमधील 28 ओबीसी वॉर्डातील उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.

न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष…

दरम्यान, काही ठिकाणी ओबीसींनी खुल्या प्रभागातूनही अर्ज भरले असल्याची माहिती मिळत आहे. तसे असेल तर संबंधित इच्छुक उमेदवारांची नाव किनार्‍याला लागणार का, याचीही उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचे आरक्षण टिकवण्यासाठी राज्य शासन काय प्रयत्न करणार, न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news