पुढारी ऑनलाईन डेस्क : Mayank Agarwal vs Sachin Tendulkar : मुंबई कसोटीपूर्वी ३० वर्षीय सलामीवीर मयंक अग्रवालबाबत (Mayank Agarwal) भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रश्न उपस्थित केले जात होते. पण त्याला मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे मैदानावरील कसोटीत संधी मिळाली. अखेर त्याने या संधीचे सोने करत भारताकडून पहिल्या डावात १५० धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर त्याने भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.
मयंकने ३११ चेंडूंचा सामना करत सामन्याचा पहिला दिवस आणि दुस-या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत फलंदाजी केली. त्याने शुबमन (८०), श्रेयस (८०), रिद्धीमान साहा (६४), अक्षर पटेल (६७) या चौघांसोबत चार अर्धशतकी भागिदारी रचून संघाला मजबूत स्थितीत पोहचवले.
मयंकची विकेट न्यूझीलंडच्या एजाज पटेलने घेतली. तो एजाजचा सातवा बळी ठरला. पण बाद होईपर्यंत मयंकने आपल्या बॅटच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले होते. खरंतर, वानखेडे स्टेडियमवरील दुसऱ्या कसोटी सामन्यात, जिथे इतर भारतीय फलंदाज किवी फिरकीपटू एजाज पटेलसमोर गुडघे टेकताना दिसले, तिथे जबाबदारीने खेळी करत अग्रवालने १५० धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याने १७ चौकार आणि चार षटकारही ठोकले. (Mayank Agarwal vs Sachin Tendulkar)
वानखेडे स्टेडियमवरील या उत्कृष्ट शतकी खेळीने भारतीय सलामीवीराने क्रिकेटच्या देवाचा म्हणजेच भारताचा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत काढला आहे. खरंतर सचिनने त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीत वानखेडे स्टेडियमवर एकूण ११ सामने खेळले. यादरम्यान त्याच्या बॅटने १९ डावात एक शतक आणि आठ अर्धशतकांच्या जोरावर ९२१ धावा केल्या. यात सचिनची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या १४८ राहिली. (Mayank Agarwal vs Sachin Tendulkar)
दुसरीकडे, वानखेडे स्टेडियमवर १५० धावांची ऐतिहासिक खेळी करणा-या मयंक अग्रवालने या मैदानावर एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिनला मागे टाकले आहे. वानखेडेवर कसोटीच्या एका डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत भारताच्या या सलामीवीराने केवळ सचिनलाच नाही तर भारताच्या राहुल द्रविड (नाबाद १००), सय्यद किरमाणी (१०२), रवी शास्त्री (१४२), कपिल देव (६९), गुंडप्पा विश्वनाथ (९५), वीरेंद्र सेहवाग (१४७), चेतेश्वर पुजारा (१३५), कृष्णमाचारी श्रीकांत (९४), अंशुमन गायकवाड (५१), बीपी पटेल (८३), मोहिंदर अमरनाथ (४९), रविचंद्रन अश्विन (नाबाद १०३), व्हीव्हीएस लक्ष्मण (६९), चेतन चौहान (८४), नवज्योतसिंग सिद्धू (७९), करसन घावरी (८६), मुरली विजय (१३६), गौतम गंभीर (६५), एमएस धोनी (६४) या दिग्गज खेळाडूंनाही मागे टाकले आहे. (Mayank Agarwal vs Sachin Tendulkar)