Ranji Trophy Final : मुंबईचे विदर्भला 538 धावांचे लक्ष्य!

Ranji Trophy Final : मुंबईचे विदर्भला 538 धावांचे लक्ष्य!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ranji Trophy Final : मुशीर खानचे शतक आणि श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे आणि शम्स मुलानी यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये विदर्भला विजयासाठी 538 धावांचे मोठे लक्ष्य दिले. मंगळवारी (दि.12) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मुंबईचा संघ दुसऱ्या डावात 418 धावांवर ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विदर्भाने एकही विकेट न गमावता 10 धावा केल्या आहेत. अथर्व तायडे (3*) आणि ध्रुव शौरे (7*) नाबाद तंबूत परतले आहेत.

तत्पूर्वी, दुसऱ्या दिवसापर्यंत मुंबईची आघाडी 260 धावांची होती. तिसऱ्या दिवशी मुशीर खान (136) आणि अजिंक्य रहाणे (73) यांनी 130 धावांची भागीदारी केली. रहाणे बाद झाल्यानंतर मुशीरने श्रेयस अय्यरसह (95) संघाचा डाव पुढे नेला. या जोडीने 168 धावांची भर घालून विदर्भाच्या गोलंदाजांचे कंबरडे मोडले. त्यानंतर शम्स मुलानीनेही अखेरच्या षटकांमध्ये मुंबईसाठी अर्धशतक (नाबाद 50) झळकावले. विदर्भाकडून हर्ष दुबेने सर्वाधिक 5 बळी घेतले. तर यश ठाकूरने 3 विकेट्स मिळवल्या. आदित्य ठाकरे आणि अमन मोखाडेने 1-1 बळी मिळवला.

मुशीरचे प्रथम श्रेणीतील दुसरे शतक

मुशीरने 326 चेंडूंचा सामना करत आणि 10 चौकारांच्या मदतीने 136 धावा फटकावल्या. हे त्याचे प्रथम श्रेणीतील कारकिर्दीतील दुसरे शतक ठरले. मुशीर रणजी ट्रॉफीमध्ये अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात, या खेळाडूने बडोदा क्रिकेट संघाविरुद्ध जबरदस्त द्विशतक (203*) झळकावले होते. यानंतर उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने तामिळनाडू क्रिकेट संघाविरुद्ध 55 धावांची खेळी केली होती.

मुशीरने मोडला सचिन तेंडुलकरचा विक्रम

मुशीर खानने आपल्या शानदार खेळीदरम्यान सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला. मुंबईसाठी रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शतक झळकावणारा तो सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. त्याने 19 वर्षे 14 दिवसांत शतक ठोकले. यापूर्वी हा विक्रम सचिनच्या नावावर होता. 1994-95 च्या रणजी हंगामाच्या अंतिम सामन्यात त्याने वयाच्या 22 व्या वर्षी पंजाबविरुद्ध शतक झळकावले होते.

श्रेयस अय्यरचे शतक हुकले

श्रेयस पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि त्याने 111 चेंडूंचा सामना करत 95 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 3 षटकार मारले. पहिल्या डावात श्रेयस काही विशेष करू शकला नव्हता. तो 15 चेंडूत 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला होती.

रहाणेने कर्णधारपदाची खेळी खेळली

रहाणे या सामन्यात 143 चेंडूत 73 धावा करून बाद झाला. 51.05 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने आपल्या डावात 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. हे त्याचे प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 57 वे अर्धशतक होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत 188 सामन्यांच्या 318 डावांमध्ये सुमारे 46 च्या सरासरीने 13,225 धावा केल्या आहेत. यात 57 अर्धशतकांसह 39 शतकांचाही समावेश आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news