मुंबई : प्रभादेवी परिसरातील राडाप्रकरणी दोन्ही गटांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल; पाच जणांची जामिनावर सुटका

मुंबई :   प्रभादेवी परिसरातील राडाप्रकरणी दोन्ही गटांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल; पाच जणांची जामिनावर सुटका

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाच्यावेळी प्रभादेवी परिसरात झालेल्या राड्यानंतर मुंबई पोलिसांनी दोन्ही गटांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. यातील एका गुन्ह्यात पोलिसांनी पाच शिवसैनिकांना अटक केली असून, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवीत शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक आमने-सामने आले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्याने त्यावेळी हा संघर्ष टळला. मात्र शनिवारी पुन्हा या वादाचे पडसाद उमटले. शनिवारी रात्री शिंदे गट आणि शिवसैनिक पुन्हा आमनेसामने आले. प्रभादेवीत झालेल्या प्रकरणाबाबत सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या पोस्टचा जाब विचारण्यासाठी शिवसैनिक त्या ठिकाणी पोहचले होते.

शिंदे गटाचे कार्यकर्ते संतोष तेलवणे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता तेलवणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला होता. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान, शिंदे गट आणि शिवसेना या दोघांकडूनही स्वागत कक्ष उभारुन एकमेकांना डिवचण्यात आले होते. यावरुन शनिवारी रात्री पुन्हा राडा झाला. त्यात तेलवणे यांना मारहाण करण्यात आली.

अखेर संतोष तेलवणे यांनी दादर पोलीस ठाण्यात आपल्याला झालेल्या मारहाणीप्रकरणी तक्रार दिली. या तक्रारीनुसार दादर पोलिसांनी एकूण ३० ते ३५ शिवसैनिकांवर भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ३२४, ३९५, ५०४ आणि ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यातील पाच शिवसैनिकांना अटक करण्यात आली. त्यानंतर शिवसेनेने आक्रमक होत अटक केलेल्या पाच शिवसैनिकांवरील कलम ३९५ मागे घेण्यात यावी. तसेच, त्यांची सुटका करण्यात यावी अशी मागणी केली. त्यानंतर गुन्ह्यातून ३९५ हे कलम हटविण्यात आले आणि अटक करण्यात आलेल्या पाच जणांना जामीन मंजूर झाला आहे.

शिंदे गट आणि शिवसेना कार्यकर्ते यांच्यात झालेल्या राड्यानंतर आमदार सदा सरवणकर हे पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे त्यांनी जमिनीवर गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. सरवणकर यांनी हे आरोप फेटाळले होते. अखेरीस शिवसेना नेत्यांनी दादरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या दिल्यानंतर याप्रकरणी भादंवि कलम १४२ ते १४९, १८६ आणि ३३६ यासह भारतीय हत्यारबंदी कायद्याच्या कलम ०३ आणि २५, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७(१) आणि १३५ अन्वये सदा सरवणकर, समाधान सरवणकर, संतोष तेलवणे, वाडेकर आणि अन्य व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी काय घडले ?

प्रभादेवी येथे शिंदे गट आणि शिवसैनिक गणपती विसर्जन मिरवणुकीत आमने-सामने आले होते. त्यावेळी शिवसैनिकांनी पन्नास खोके, एकदम ओके अशा घोषणा दिल्या. तर, शिंदे गटाकडून म्याव म्यावच्या घोषणा देण्यात आल्या. एकमेकांविरोधात जोरदार घोषणा देत शिंदे गट आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यानंतर वातावरण चांगलेच तापले. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले होते. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज आणि मध्यस्थी केल्याने हा वाद थांबला होता.

वाद विकोपाला..

शिंदे आणि ठाकरे गट यांच्यातील दादरमधील संघर्ष शिगेला पोहचला आहे. सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांना शुभेच्छा देणारे दादर व माहिम परिसरातील पोस्टर्स शिवसैनिकांनी फाडले आहेत. सरवणकर यांच्या संपर्क कार्यालयावरही दगडफेक करण्यात आली आहे. मात्र या घटनेनंतर अद्याप सरवणकर गटाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news