MS Dhoni shocking Decision : धोनीच्या ‘दे धक्का’ स्टाईलची पुन्हा एकदा चर्चा !

MS Dhoni shocking Decision : धोनीच्या ‘दे धक्का’ स्टाईलची पुन्हा एकदा चर्चा !
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा हेलिकॉप्टर शॉट जसा फेमस आहे, तशीच त्याची चाहत्यांना अचानक 'दे धक्का' देण्याची स्टाईलही प्रसिद्ध आहे. आयपीएल २०२२ (IPL 2022) सुरू होण्यापूर्वी त्याने एक मोठा निर्णय घेतल्यानंतर याची प्रचिती पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली. आज (दि. २४) त्याने अचानक चेन्नई सुपर किंग्जचे (CSK) कर्णधारपद सोडल्याचे जाहीर केले. CSK ने त्यांच्या ट्वितरवरून याचे निवेदन जारी केले. धोनीच्या जागी आता अष्टपैलू रविंद्र जडेजा नेतृत्वाची धुरा सांभाळेल. धोनी या पुढे आयपीएलच्या १५व्या हंगामात खेळाडू म्हणून खेळताना दिसणार आहे. (MS Dhoni shocking Decision)

२६ मार्चपासून आयपीएल २०२२ ला सुरुवात होत आहे. पहिला सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सीएसके विरुद्ध केकेआर असा रंगणार आहे. मात्र पहिला सामना दोन दिवसांवर आला असतानाच एमएस धोनीने आयपीएल जगतासह चाहत्यांना झटका दिला आणि सीएसकेचे कर्णधारपद सोडले. त्याच्या या निर्णयानंतर क्रिकेट चाहते सुन्न झाले आहेत.

धोनीने अचानक घेतलेल्या निर्णयाने सर्वांना चकित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कसोटी आणि वनडेचे कर्णधारपदही अचानक सोडले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय करिअर असो की आयपीएल कारकीर्द, धोनीच्या कर्णधारपदाच्या विक्रमाची बरोबरी करणे तसे सोपे नाही. (MS Dhoni shocking Decision)

कर्णधार म्हणून धोनीचा विक्रम…

धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३०० हून अधिक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आणि त्याच्या विजयाची टक्केवारी ५० टक्क्यांहून अधिक होती. धोनीने वनडे, टी-२० आणि कसोटीसह ३३२ सामन्यांमध्ये टीम इंडियाची कमान सांभाळली. यापैकी १७८ सामने जिंकले, तर १२० सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी २० विश्वचषक (२००७), एकदिवसीय विश्वचषक (२०११) आणि चॅम्पियन्स ट्रॉफी (२०१३) जिंकली. (MS Dhoni shocking Decision)

तर, आयपीएलचा विचार केल्यास धोनीने या लिगच्या पहिल्या हंगामापासूनच चेन्नईचे कर्णधारपद स्वीकारले. गेल्या १४ हंगामात धोनीने २०४ सामन्यांमध्ये CSK चे नेतृत्व केले. यापैकी चेन्नईने १२१ सामने जिंकले तर ८२ सामने गमावले. धोनीच्या नेतृत्वाखाली, चेन्नई सुपर किंग्जने चार वेळा आयपीएल ट्रॉफी (२०१०, २०११, २०१८ आणि २०२१)चे विजेतेपद जिंकले.

धोनी हा भारताचा कसोटीतील दुसरा सर्वोत्तम कर्णधार…

धोनीकडे २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय टी २० चे नेतृत्व सोपवण्यात आले होते. त्यानंतर त्याने टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताला विजय मिळवून दिला आणि सर्वांची मने जिंकली. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्याला एकदिवसीय सामन्यांचे कर्णधारपद सोपवले. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच भूमीवर तिरंगी वनडे मालिकेत पराभवाची धुळ चारली. २००८ ही खेळवली गेली होती. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत व्यतिरिक्त श्रीलंका हा तिसरा संघ होता. (MS Dhoni shocking Decision)

२००८ मध्ये अनिल कुंबळेने कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीकडे कसोटी कर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर धोनीने मागे वळून पाहिले नाही आणि टीम इंडियाला यशाच्या शिखरावर नेले. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया २०१० मध्ये टेस्टमध्ये नंबर वन टीम बनली होती. त्याचवेळी, २०११ मध्ये भारताने श्रीलंकेला हरवून एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. २०१३ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला त्याच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते. (MS Dhoni shocking Decision)

धोनीचे कसोटी करियर

एकूण कसोटी : ६०
विजय : २७
पराभव : १८
अनिर्णित : १५

२००८ च्या आयपीएल लिलावात धोनी हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता…

२००८ मध्येच आयपीएलची घोषणा झाली होती. त्यानंतर झालेल्या लिलावात धोनीला चेन्नईने सहा कोटी रुपयांना विकत घेतले. त्या लिलावात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्यानंतर धोनी आणि सीएसके हे समीकरण अतुट झाले. चेन्नई संघावर २०१६ आणि २०१७ मध्ये बंदी घालण्यात आली होती. त्या दोन हंगामामध्येच धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळायला होता.

धोनीचे 'दे धक्का'तंत्र!

भारतीय संघ २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर गेला होता. त्यानंतर अॅडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत धोनी दुखापतीमुळे खेळला नाही. दुसऱ्या कसोटीत त्याने पुनरागमन करून संघाचे नेतृत्व केले. दुसऱ्या कसोटीनंतर धोनीने अचानक कसोटीतून निवृत्ती जाहीर केली. त्या निर्णयाने भारतीय क्रिकेटचे सर्व चाहते थक्क झाले.

२०१७ मध्येही असेच काहीसे घडले होते. २०१७ मध्ये धोनीने अचानक वनडे आणि टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. मात्र, २०१९ च्या विश्वचषकापर्यंत तो वनडे क्रिकेट खेळत राहिला. यानंतर वर्षभर धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. तो भारताकडून खेळणार की नाही याबाबत कुणालाही समजले नाही. अखेर १५ ऑगस्ट २०२० रोजी, संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास धोनीने अचानक वनडे आणि टी २० मधून निवृत्ती जाहीर केली. चाहत्यांसाठी हा खूप दुःखाचा क्षण होता. आता आयपीएलमध्येही धोनीने असेच काहीसे केले आहे. धोनीची ही शेवटची आयपीएल असू शकते, असे मानले जात आहे. त्यानंतर ते निवृत्त होईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. (MS Dhoni shocking Decision)

धोनीचे वनडे सामन्यांमध्ये वर्चस्व…

एकूण वनडे : २००
विजय : ११०
पराभव : ७४
अनिर्णित : ०५
निकाल नाही : ११

टी २० मध्ये कॅप्टन कूल धोनीचा जलवा

एकूण सामने : ७२
विजय : ४१
पराभव : २८
टाय : ०१
निकाल नाही : ०२

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news