नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2023 द्वारे 673 पदांची भरती प्रक्रिया; 4 जूनला होणार संयुक्त पूर्वपरीक्षा

नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2023 द्वारे 673 पदांची भरती प्रक्रिया; 4 जूनला होणार संयुक्त पूर्वपरीक्षा

पुणे, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा 2023 जाहीर करण्यात आली. त्यानुसार या परीक्षेद्वारे पाच विभागांतील 673 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असून, संयुक्त पूर्वपरीक्षा 4 जून रोजी 37 जिल्हा केंद्रांवर होणार आहे. एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

सामान्य प्रशासन विभाग, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये विभाग, या विभागांतील 673 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पूर्वपरीक्षेतील निकालाच्या आधारे पात्र ठरणार्‍या उमेदवारांची मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे घेण्यात येईल. त्यानुसार राज्यसेवा मुख्य परीक्षा 7 ते 9 ऑक्टोबर, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट 'अ' आणि गट 'ब' मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर, विद्युत अभियांत्रिकी सेवा गट 'ब' मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर, निरीक्षक वैधमापनशास्त्र गट 'ब' मुख्य परीक्षा 21 ऑक्टोबर, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा गट 'ब' मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबरला होणार आहे. या परीक्षेसाठी 2 ते 22 मार्च या कालावधीत ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरता येईल. चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी 28 मार्च ही अंतिम मुदत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

पदसंख्या आणि आरक्षणामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पदसंख्या आणि आरक्षणात बदल झाल्यास त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेत केला जाईल. पूर्वपरीक्षेचा निकाल जाहीर करेपर्यंतच्या कालावधीत शासनाकडून सुधारित मागणीपत्राद्वारे प्राप्त होणारी पदे पूर्वपरीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जातील, असे देखील आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news