बिहारप्रमाणे आरक्षण देण्यासाठी हालचाली; अजित पवार, शंभूराज देसाई यांच्याकडून मागणीचे समर्थन

बिहारप्रमाणे आरक्षण देण्यासाठी हालचाली; अजित पवार, शंभूराज देसाई यांच्याकडून मागणीचे समर्थन
Published on
Updated on

कराड, पुढारी वृत्तसेवा : बिहारप्रमाणे महाराष्ट्रातील आरक्षणाची सध्याची मर्यादा वाढवण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी कराड येथे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा विचार झाला तर आरक्षणाची कोंडी फुटू शकते, असे मत व्यक्त केले. दुसरीकडे त्यांच्या या मताशी सहमती दर्शवत सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा करून मंत्रिमंडळासमोर त्याबाबतचा प्रस्ताव मांडण्याचा विचार करता येईल, असे सांगितले.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार तथा राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी अभिवादन केल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आरक्षणाबाबतचे आपले मत व्यक्त केले.

बिहारने अलीकडेच राज्यातील आरक्षणावरून निर्माण झालेली कोंडी दूर करण्यासाठी आरक्षणाची एकूण मर्यादा 50 टक्क्यांवरून 65 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा वाढवली जावी, अशी मागणी सातत्याने झाली आहे. त्यानंतर खुद्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच या मागणीचा पुनरुच्चार केल्याने त्याबाबतच्या हालचालींना वेग येऊ लागला आहे. अजित पवार यांनी म्हटले आहे की, कोणत्याही जातीचे आरक्षण कमी न करता प्रत्येकाला त्याच्या वाट्याचे आरक्षण मिळालेच पाहिजे आणि हे साध्य करायचे असेल तर आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची गरज आहे. मंत्री शंभूराज देसाई यांनीही त्यांच्या या मागणीचे
समर्थन केले. त्यामुळे येणार्‍या काळात आरक्षणाची मर्यादा वाढवण्याबाबत शासकीय पातळीवर प्रयत्न होण्याची शक्यता बळावली आहे.

मुख्यमंत्री शब्द पाळतील

प्रत्येकाला आरक्षणाची मागणी करण्याचा अधिकार आहे. मात्र ती मागणी कायद्याच्या चौकटीत बसविण्यासाठी आवश्यक वेळ द्यावाच लागतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही जनतेला शब्द दिला असून तो ते पाळतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनावेळी पोलिसांकडून लाठीमार झाला होता. याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून योग्य पद्धतीने तपास सुरू आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता तपास केला जात असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही अजित पवार यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात सुसंस्कृत राजकारण, समाजकारण कसे करायचे याचा आदर्श घालून देत सत्ताधारी व विरोधकांमध्ये एकोपा निर्माण केला होता. राज्याचे नेतृत्व करताना त्यांनी घेतलेले निर्णय किती महत्त्वपूर्ण होते याची जाणीव आज प्रत्येक राज्यकर्त्याला काम करताना होते.

अजित पवार यांनी वाचाळवीरांना फटकारले

मंत्री छगन भुजबळ, मनोज जरांगे-पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांकडून होणार्‍या वक्तव्यांबाबत बोलताना नामोल्लेख टाळत अजित पवार यांनी सत्ताधारी व विरोधी पक्षांनी एकमेकांच्या भूमिका समजून घेत कोणाच्याही भावना दुखावतील अशी वक्तव्ये करू नयेत, अशा शब्दांतफटकारले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news