केवळ परीक्षा म्हणजे जीवन नाही, सणही महत्त्वाचे : मद्रास उच्च न्यायालयाने विद्यार्थ्याची याचिका फेटाळली
पुढारी ऑनलाईन डेस्क : गावातील सणावेळी असणार्या उत्सवामुळे दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते, यात शंका नाही;पण यासाठी सणालाच स्थगिती देणे, हा उपाय होणार नाही. गावातील मुलांनी दिवसा निर्जन ठिकाणी अभ्यास करता येतो. जीवन म्हणजे केवळ परीक्षा नाही, सणही महत्त्वाचे आहेत, असे स्पष्ट करत गावातील उत्सव स्थगित करण्याबाबत दाखल जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळली.
सेलम जिल्ह्यातील ग्राम उत्सवाला स्थगितीसाठी जनहित याचिका
सेलम जिल्ह्यातील स्थानिक ग्राम समित्या आणि मंदिर प्राधिकरण मार्च ते एप्रिल महिन्यात पांगुनी उत्सव सादर करतात. उत्सव काळात लावण्यात येणार्या लाऊडस्पीकर व अन्य गोष्टींमुळे दहावी आणि बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे गावातील उत्सव स्थगित करण्याचे आदेश स्थानिक ग्राम समित्या आणि मंदिर प्राधिकरणाला देण्यात यावेत, अशी मागणी करणारी याचिका एस. मुरुगेसन यांनी मद्रास उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावर मुख्य न्यायमूर्ती टी राजा आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
मंदिराचा वार्षिक उत्सवाला स्थगिती हा उपाय नाही : उच्च न्यायालय
यावेळी खंडपीठाने स्पष्ट केले की, उत्सवामुळे दहावीच्या बोर्ड परीक्षा देणार्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते;पण गावातील मंदिराचा वाषिंक उत्सवाला स्थगिती देणे हा त्यावरील उपाय नाही. राज्यातील हजारो विद्यार्थी अनेक अडथळ्यांचा सामना करत दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेची तयारी करत असतात. त्यामुळे एका मुलासाठी संपूर्ण जिल्ह्यातील उत्सव थांबवू शकत नाही, असेही खंडपीठाने यावेळी नमूद केले.
परीक्षेच्या दिवशी लाऊडस्पीकर वापरास बंदी
स्थानिक ग्राम समित्या आणि मंदिर प्राधिकरणाला ध्वनी प्रदूषण प्रतिबंध नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच उत्सव साजरा करणाऱ्या सर्व गावांमध्ये आवश्यक सुरक्षा व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या वतीने यावेळी न्यायालयास देण्यात आली. संबंधित गाव समित्यांना परीक्षेच्या दिवशी लाऊडस्पीकर न वापरण्याचे निर्देश देत मद्रास उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली.
हेही वाचा :