पुणे : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी यावर्षी अधिक सुविधा : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी यावर्षी अधिक सुविधा : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख

पुणे : पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेला विजयस्तंभ अभिवादन सोहळा शांतता आणि उत्साहात साजरा व्हावा यासाठी यावर्षी अधिकच्या सुविधा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.राजेश  देशमुख यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,  पोलीस अधीक्षक अंकित गोयल , प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, समाज कल्याण उपायुक्त बाळासाहेब साळुंके, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. देशमुख म्हणाले, विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनातर्फे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. सोहळ्याच्या आयोजनासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कायमस्वरूपी समिती गठीत करण्यात आली आहे. अधिक व्यापक स्वरुप देण्यासाठी आणि सुविधा निर्मितीसाठी शासनाने मंजूर केलेल्या निधीतून अल्पकालिन आणि दीर्घकालिन नियोजन करण्यात येत आहे. सोहळा अधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येईल.

यावर्षी अधिक संख्येने अनुयायी येण्याची शक्यता असल्याने वाहनतळाची संख्या वाढविण्यात येणार आहे. पाण्याच्या टँकर्सची संख्या वाढविण्यात येणार असून १५० टँकर असतील. दीड हजार फिरती शौचालये, पीएमपीएमएलच्या ३६० बसेस, ३० रुग्णवाहिका, दुचाकी आरोग्य पथके, अग्निशमन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्य सुविधेसाठी १४० वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी आणि ५ हजार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. परिसरातील खाजगी रुग्णालयांना खाटा आरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पोलीस विभागाला सोहळ्याच्या वेळी परिसरातील वाहतूक वळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सह्याद्री वाहिनीवरून सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

श्री. कर्णिक म्हणाले, नियोजन करताना विविध संघटना आणि नागरिकांच्या सूचना लक्षात घेण्यात येतील. आयोजनादरम्यान कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. आनंदाच्या वातावरणात सोहळा साजरा व्हावा यासाठी पोलीस नागरिकांशी समन्वय ठेऊन काम करेल. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोहळ्याच्या आयोजनाबाबत सूचना केल्या आणि सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news