पुढारी ऑनलाईन डेस्क: देशातून नैऋत्य मान्सून परतीचा प्रवास २५ सप्टेंबरपासून नैऋत्य राजस्थानातून सुरू झाला. दरम्यान आज (दि.) महाराष्ट्रातून देखील मान्सून परतीची वाटचाल सुरू झाली आहे. या संदर्भातील माहिती भारतीय हवामान विभागाने दिलेल्या आज (दि.६) दुपारच्या बुलेटीनमध्ये दिले आहे. (Monsoon withdrawal)
हवामान विभागाने दिलेल्या बुलेटिननुसार, सध्या मध्य प्रदेश, गुजरात या राज्यातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू आहे. दरम्यान आज (दि.६) महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश आणि कोकणातील काही भागातून नैऋत्य मान्सून परतीचा प्रवास सुरू झाल्याचेही हवामान विभागाने म्हटले आहे. (Monsoon withdrawal)
मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असून येत्या दोन-तीन दिवसात राज्याचा दक्षिण मध्य भाग वगळता अन्य भागातूनही मान्सून परतेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने दिला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणातून मान्सून येत्या १० ऑक्टोबरपासून परतण्याची शक्यता आहे. मान्सून परतीचा प्रवास राजस्थानमधून साधारण १७ सप्टेंबरदरम्यान सुरु होत असतो. मात्र यावर्षी आठवडाभर उशिरा मान्सून परतीचा प्रवास सुरू झाला आहे. (Monsoon withdrawal)
दरवर्षी ७ जून रोजी दाखल होणारा मान्सून यंदा २५ जूनला दाखल झाला. त्यानंतर जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. दरम्यान सप्टेंबरमध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. मान्सून परतीच्या पार्श्वभूमीवर काही राज्यात हलका पाऊस सुरूच आहे. दरम्यान २५ सप्टेंबरपासून देशातून परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. राजस्थानातील नैऋत्य भागातून नैऋत्य मान्सून परतीचा प्रवास सुरू झाला आहे. दरम्यान आजपासून महाराष्ट्रातील काही भागातून मान्सून परतीला सुरूवात झाली आहे. (Monsoon withdrawal)