पुढारी ऑनलाईन डेस्क : नैऋत्य मान्सूनने आता संपूर्ण भारत व्यापला आहे, ही आनंदवार्ता भारतीय हवामान विभाग, पुणेचे विभागप्रमुख डॉ. के. होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून आज (दि.२ जुलै) दिली. मान्सून संपूर्ण भारत व्यापण्यासाठी दरवर्षी साधारण ८ जुलैपर्यंत वाट पाहावी लागते, मात्र यंदा ६ दिवसआधीच रविवारी २ जुलै रोजी मान्सूनने (Monsoon Update) संपूर्ण भारत व्यापला आहे, अशी माहिती डॉ. के. होसाळीकर यांनी दिली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहीतीनुसार, मान्सून सध्या राजस्थान, हरियाणा आणि पंजाबच्या उर्वरित भागात आज मान्सून पुन्हा पुढे सरसावला आहे. दरम्यान पुढचे काही दिवस भारताच्या दक्षिण द्वीपकल्पावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची (Monsoon Update) शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरवर्षी १ जून दरम्यान मान्सून भारतात म्हणजेच केरळात दाखल होतो. यंदा मात्र ८ जूनला मान्सून केरळात पोहचला. यानंतर ११ जून रोजी तो महाराष्ट्रातील तळकोकणात होता. बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कित्येक दिवस तो तिथेच रखडला होता. चक्रीवादळाची स्थिती थंडावल्यानंतर पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आणि रविवारी २५ जून रोजी मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. यानंतर आज रविवारी (दि.२ जुलै) मान्सूनने संपूर्ण देश व्यापला आहे. यापूर्वी ८ जुलै रोजी हा मान्सून संपूर्ण देश व्यापत होता. यंदा मात्र मान्सूनने ६ दिवस आधीच म्हणजे २ जुलै संपूर्ण भारत व्यापला आहे, असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.