Monsoon Session : आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; सत्ताधारी सरसावले, विरोधकही तयारीत

Monsoon Session : आजपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन; सत्ताधारी सरसावले, विरोधकही तयारीत

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session) सोमवारपासून सुरू होत असून ते सुरळीत पार पाडण्यासाठी सत्ताधारी आघाडीने जय्यत तयारी केली आहे. विरोधी पक्षांनी चहापानावर बहिष्कार टाकत सरकारला धारेवर धरणार असल्याचे रविवारी स्पष्ट केले. दरम्यान, विरोधकांकडे कोणतेही विषय नहाीत. आमची ताकद वाढली असून अधिवेशनात उपस्थित होणार्‍या सर्व विषयांवर चर्चेची सरकारची तयारी आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.

अधिवेशनापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट सरकारमध्ये सामील झाल्याने सत्ताधारी पक्षाची बाजू भक्कम झाली आहे. अशावेळी सरकारचा सामना करताना विरोधकांची कसोटी लागणार आहे.

कमकुवत झालेल्या विरोधी पक्षाची सारी भिस्त ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची सारी भिस्त ही आमदार भास्कर जाधव यांच्यावर राहणार आहे. अधिवेशनात विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याची निवड, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रतोद आणि गटनेता कोण, कोणता गट खरी राष्ट्रवादी ठरणार यावर तांत्रिक लढाई रंगणार असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कोणाच्या बाजूने निर्णय देतात, हे देखील स्पष्ट होणार आहे.

पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. अधिवेशनापूर्वी भाजपने शिवसेनेच्या फुटीची पुनरावृत्ती केली. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आमदारांचा मोठा गट सरकारमध्ये सामील झाल्याने महाविकास आघडी कमकुवत झाली आहे. सत्ताधार्‍यांकडे आता सुमारे दोनशे आमदार असून त्यांचा सामना विरोधी पक्षाला करावा लागणार आहे. त्यातच अधिवेशनापूर्वी अजित पवार गटाच्या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन विरोधी पक्षांमध्ये संभ्रम निर्माण करण्याची खेळी केली आहे.

विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार? (Monsoon Session)

राष्ट्रवादीचे सुमारे 40 आमदार अजित पवारांसोबत गेल्याने शरद पवारांच्या गटाकडे आता 15 पेक्षा कमी आमदार उरले आहेत. मात्र, पवार गटाने आमदार जितेंद्र आव्हाड यांची विधिमंडळ प्रतोदपदी नियुक्ती करत असल्याचे पत्र दिले आहे. तसेच आव्हाड यांचे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्याने महाविकास आघाडीत 44 आमदार असलेला काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे संख्याबळानुसार काँग्रेस विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याची शक्यता आहे. त्यावर महाविकास आघाडीत काय घडते आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news