Mohata Devi : आणि म्हणून या गावात मोहटा देवीच्या आशिर्वादाने दूध, तूप विकलं जात नाही

Mohata devi
Mohata devi

पाथर्डी शहरापासून सुमारे नऊ किलोमीटर अंतरावर पूर्व भागातील उंच डोंगरावर मोहटादेवीचे स्वयंभू स्थान आहे. देवस्थान समितीने लोकवर्गणीतून कोटयावधी रूपये खर्चुन भव्य मंदिर उभारले आहे. देशातील देवी मंदिरापैकी सर्वात मोठे आकर्षक मंदिर सुध्दा प्रेक्षणीय असून संपूर्ण मंदिराची रचना श्री यंत्रकार आहे. आश्विन शुद्ध प्रतिप्रदेपासून कोजागिरी पौर्णिमेपर्यंत अशी पंधरा दिवस यात्रा येथे चालते. नवसाला पावणारी अशी या मोहटा देवीची ख्याती आहे. जागांच्या कल्याणासाठी रेणुकादेवी येथे प्रकट झाली आणि मोहटा देवी म्हणून प्रसिद्ध झाली अशी आख्यायिका सांगितली जाते.

घटस्थापना ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव चालतो. या घटस्थापने दिवशीही रविवारी सकाळी अकरा वाजता देवीचा मुखवटा वाजत गाजत मोहटे गावातून देवी गडावर येऊन त्यानंतर घटस्थापना होईल. भजन, कीर्तन, जागर, हरिपाठ, गड प्रदक्षिणा, गोंधळ गीते, सुवासिनी पूजन, होमहवन असे विविध कार्यक्रम उत्सव कालावधीत होणार आहेत. देवीचे मंदिर अहोरात्र देवी भक्तांच्या दर्शनासाठी खुले राहणार आहे.

शारदीय नवरात्र महोत्सवाची मोहटा देवस्थानात तयारी पूर्ण झाली असून अष्टमी होमापर्यंत घटीस ( अनुष्ठानास) बसणाच्या महिला राज्याच्या विविध भागातून दाखल होत आहेत.रविवार दि. १५ सकाळी ११ वाजता जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान समितीच्या अध्यक्ष सुनिल गोसावी यांच्या हस्ते घटस्थापना होऊन पारंपरिक उत्सवाला प्रारंभ होणार असल्याची माहिती मोहटा देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली.

मोहटा देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी पाहता मोहटा देवस्थानने भाविकांच्या सोयी सुविधांसाठी संपूर्ण तयारी केली असून आरोग्य,सुलभ दर्शन बारी, पिण्याचे पाणी, सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे, घटी बसणाऱ्यांना भाविकांसाठी फराळाचे वाटप,देवीची दोन वेळेची आरतीचे एलईडी टीव्ही वरती मंदिर परिसर प्रक्षेपण, ऊन आणि पावसापासून बचाव करण्यासाठीं मंदीर परिसरात मंडप व्यवस्था आदी सोयी सुविधा देण्यात आले आहेत. पोलीस प्रशासनाकडूनही यंदाच्या भाविकांचा गर्दीचा उच्चांक पाहता सुरक्षेच्या दृष्टीने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देवस्थान समितीचे सुरक्षा रक्षक, होमगार्ड, स्वयंसेवक भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे.

असा आहे नवरात्रीचा सोहळा :

दि. १५ ते २३ ऑक्टोबर पर्यंत राज्यातील नामावंत कीर्तनकाराचे कीर्तन रोज रात्री होईल. २३ ऑक्टोबर रोजी काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता होईल. अष्टमी होमहवन २२ ऑक्टोबर रोजी प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर वें. यार्लगड्डा यांचे हस्ते होईल. दसऱ्याच्या दिवशी सायंकाळी सिमोल्लंघन सोहळा, शस्त्रपूजन होईल. दि २५ ऑक्टोबर मोहटा देवीची यात्रा असून गावात दिवसभर पालखी दर्शन रात्री उत्सव मूर्तीची पालखी मिरवणुक निघुन मध्यरात्री नंतर गडावर शोभेची दारू उडविण्यात येणार आहे. २७ ऑक्टोबरला सकाळी कलाकारांच्या हजेच्या व दुपारी कुस्त्यांचा हंगामा होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.कोजागिरी पौर्णिमेला रात्री महाआरती व दुग्धप्रसादाने नवरात्रोत्सवाची सांगता होईल. नवरात्र काळात कुमारिका पूजन, सुवासिनीची ओटी भरणे, दृष्ट काढणे, कुंकुमार्चन पूजा, आदी विधी वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने साजरे होतात. राज्याच्या विविध भागातून घटी बसविणाऱ्या सुमारे दहा हजार महिला मंदिराच्या पारायण व महाप्रसाद हॉलमध्ये दाखल होत आहेत. सुसज भक्तनिवास, अहोरात्र मोफत महाप्रसाद ,विशेष अतिथी निवास, भव्य वाहनतळाची सुविधा आहे. मुख्य दर्शन मार्गामध्ये अष्टभैरव, चौसष्टयोगिनी, दशमहाविद्या मंदिर आहेत. सुमारे दोनशे किलोमीटर परिसरातून भाविक पायी चालत दर्शनासाठी येतात.

इथे दूध, तूप विकलं जात नाही…

एक दिवस मोहटा गावामध्ये एकदा वाट चुकलेल्या म्हशी आल्या. म्हशी काही दिवस सांभाळून ज्यांच्या असतील त्यांना देऊ अशीच भावना ठेवून ग्रामस्थांनी त्या ठेवून घेतल्या. अनेक दिवस वाट पाहूनही कुणीही आले नाही. मात्र ही वार्ता मोगलांच्या नाकेदारांना कळली व त्यांनी म्हशी चोरीचा आरोप भक्तांवर केला. आणि त्यांना बोलावून बंदिस्त करण्याचे आदेश केला. चोरीचा आळ आलेल्या बिचाऱ्या भक्तांस या गोष्टीचे खूप दुःख झाले. दुःखातून मुक्त होण्यासाठी त्यांनी मोहटादेवीची आळवणी केली.

खडा पहारा केला उपवास केला व नवस केला. आई, यापुढे आम्ही गायी-म्हशीचे दूध, तूप, विकणार नाही व तुला अर्पण केल्याशिवाय खाणारदेखील नाही, परंतु हे संकटनिवारण कर. आम्ही कोणतीही चोरी केली नाही. भक्तांची भावना व सत्यसंकल्प पाहून मोहटादेवीची कृपा झाली. दुसऱ्या दिवशी नाकेदार, बंदिस्त करण्यास येणार होते त्याप्रमाणे आले आणि पाहतात तर रात्रीतून म्हशीचा काळा रंग बदलून पांढरा झाला. आदल्या दिवशी पाहिलेल्या ह्या म्हशी नाहीत हे नाकेदारांच्या लक्षात आले.व त्यांनी बंदिस्त करण्याचा हुकुम रद्द केला. तेव्हापासून आजपर्यत दहिफळे घराण्यातील लोक दूध, दही, तूप विकत नाहीत. व देवीस अर्पण केल्याशिवाय खातही नाहीत.

कसे जाल ? 

मुंबई पासून : मुंबई ते अहमदनगर या मार्गावर बस, रेल्वे किंवा खासगी वाहनाने जाता येते

पुण्याहून : पुणे ते नगर हे अंतर जवळपास तीन तासांचे आहे. पुण्याहून बसने सहज जाता येते.

नगरला पोहोचल्यानंतर नगर ते पाथर्डी या साठी अनेक बस किंवा खासगी वाहने उपलब्ध असतात.

पाथर्डीला पोहोचल्यानंतर तिथून देवीच्या गडावर जाण्यासाठी वाहन व्यवस्था उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news