पुढारी ऑनलाईन डेस्क : मोहम्मद शमी आपल्या भेदक गोलंदाजीने नेहमीच विकेट्स पटकावत असतो. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने आक्रमक फलंदाजी केली. मोहम्मद शमीने ४७ चेंडूमध्ये ३७ धावा केल्या. यामध्ये २ चौकार आणि ३ षटकारांचाही समावेश होता. (Mohammed Shami in Test Cricket) शमीने कसोटी क्रिकेटमध्ये षटकार लगावण्यात विराट कोहलीला मागे टाकले आहे.
मोहम्मद शमी त्याच्या अचूक आणि भेदक माऱ्यासाठी ओळखला जातो. त्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा उडवला . शमी कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. (Mohammed Shami in Test Cricket) दरम्यान, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली फलंदाजीही केली. त्याने आक्रमक फलंदाजी करत भारतीय संघासाठी मोठे योगदान दिले. १० व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मोहम्मद शमीने २ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ४७ चेंडूमध्ये ३७ धावा केल्या.
३२ वर्षीय मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमध्ये २५ षटकार लगावले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये षटकार फटकविण्यात त्याने विराट कोहली आणि युवराज सिंगला मागे टाकले आहे. शमीने कसोटी क्रिकेटमधील ६१ वा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. तर विराट कोहलीने १०५ कसोटी सामने खेळले असून २४ षटकार लगावले आहेत. युवराज सिंग आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जात होता. त्याने टी२० क्रिकेटमध्ये एका षटकामध्ये ६ षटकार लगावण्याचा विक्रम केला होता. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ४० सामने खेळले असून केवळ २२ षटकार लगावले आहेत. (Mohammed Shami in Test Cricket)