भारतीय सीमेवर चिनी लष्कराची जमवाजमव

भारतीय सीमेवर चिनी लष्कराची जमवाजमव
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय सीमेवर चीनने लष्करी जमवाजमव सुरूच ठेवली असून, सीमेवर भूमिगत गोदामे, रस्ते, गावे, धावपट्ट्या आणि हेलिपॅड उभारणीची कामे वेगात सुरू ठेवल्याचे 'पेंटॅगॉन'ने आपल्या अहवालात म्हटले आहे. चीनची ही लष्करी सज्जता संपूर्ण आशिया खंडासाठीच धोकादायक असल्याचा इशारा 'पेंटॅगॉन'ने दिला आहे.

चीनच्या लष्करी सामर्थ्याबाबत 'पेंटॅगॉन'ने सादर केलेल्या अहवालात चीनच्या लष्करी सज्जतेवर प्रकाशझोत टाकला असून, भारतीय सीमेवर चीनच्या लष्करी हालचालींचीही त्यात नोंद आहे. अहवालात म्हटले आहे की, चीन आणि भारताची सीमा 3,488 कि.मी.ची असून, त्या भागात चीनने लष्करी बळ वाढवण्यास मागच्या काही वर्षांपासून प्रारंभ केला आहे. चीनच्या या कारवाया कमी होण्याची चिन्हे नसून, उलट त्यात वाढच होत आहे.

सैन्याची तैनाती वाढवली

लडाखमधील भारतीय सीमेवर चीनने गेल्यावर्षी एक बॉर्डर रेजिमेंट तैनात केली. तिला शिनजियांग आणि तिबेटमधील लष्करी ठिकाणांवरील तुकड्यांची साथ मिळाली आहे. तसेच चार संयुक्त सशस्त्र ब्रिगेडही राखीव म्हणून तयारीत ठेवण्यात आल्या आहेत. या राखीव ब्रिगेडमध्ये 4,500 सैनिक, रणगाडे, दारूगोळा, क्षेपणास्त्रे व इतर सामग्रीचा समावेश आहे.

अरुणाचलातही तीन ब्रिगेड तैनात

सिक्कीम व अरुणाचलच्या सीमेवरही चीनने तीन ब्रिगेड तैनात केल्या असून, उत्तराखंड व हिमाचलच्या सीमेवरही आणखी तीन ब्रिगेड हलवल्या आहेत. यातील काही तुकड्या मागच्या काळात हटवल्या असल्या, तरी सध्या तेथे असलेले चिनी सैन्यबळही धोकादायक म्हणावे अशा संख्येचे आहे.

सीमेलगत बांधकामांना प्रचंड वेग

'पेंटॅगॉन'ने म्हटले आहे की, चिनी लष्कराने सीमेवर पायाभूत सुविधांची निर्मिती जोरात सुरू केली असून, ती सारी लष्कराच्या मदतीसाठी आहे, हे स्पष्ट आहे. त्यात भूमिगत बंकर्स, गोदामांचे बांधकाम डोकलाम भागात सुरू आहे, तर तीन ठिकाणी नवीन रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. शिवाय, भूतानलगतच्या भागात नवीन गावे वसवण्यात येत आहेत. पँगाँग तलावावर दुसर्‍या पुलाचे बांधकाम सुरू आहे. याशिवाय सीमेलगत एकेठिकाणी नागरी व लष्करासाठी उपयोगी ठरेल अशा विमानतळाचे काम सुरू आहे. तेथे मोठ्या प्रमाणावर धावपट्ट्या आणि हेलिपॅडची उभारणी सुरू आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news