पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका घरात चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला. स्फोटामुळे खोलीला आग लागल्याने ४ चिमुकल्यांचा होरपळून मृत्यू झाला. मुलांना वाचवताना आई-वडीलही आगीत भाजले, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सारिका (वय १०), निहारिका (वय ८), गोलू (वय ६) आणि कल्लू (वय ५) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.
मुझफ्फरनगर जिल्ह्यातील सिखेडा येथे जॉनी (वय ४१) त्याची पत्नी बबिता (वय ३७) आणि चार मुले एका घरात भाड्याने राहतात. जॉनी हा मजूर म्हणून काम करतो. शनिवारी (दि. २३) सायंकाळी खोलीत मुले खेळत होती. त्यावेळी खोलीतील बेडवर मोबाईल चार्जिंगला लावला होता. यावेळी शॉर्टसर्किट झाल्याने मोबाईलचा स्फोट होऊन बेडने पेट घेतला. खोलीला आगीने वेढल्याने मुलांनी आरडाओरडा सुरू केला. स्फोट आणि मुलांचा आवाज ऐकून जॉनी आणि बबिता स्वयंपाकघरातून खोलीकडे धावले. दोघांनीही होरपळलेल्या अवस्थेत मुलांना आगीतून बाहेर काढले. मुलांना वाचवताना बबिता आणि जॉनीही गंभीररित्या भाजले. सर्वांना रुग्णालयात दाखल केले, तेथे उपचारादरम्यान चारही मुलांचा मृत्यू झाला. आई बबिता यांना गंभीर अवस्थेत दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर वडिल जॉनी यांचीही प्रकृती चिंताजनक आहे.