![प्रकाश आवाडेंची बंडखोरी; मुख्यमंत्र्यांच्या आजच्या दौऱ्याकडे लक्ष](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F01%2Fprakash-awade-1.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून इचलकरंजीचे भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी आपली उमेदवारी जाहीर केल्याने महायुतीला मोठा धक्का बसला आहे. महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे असून शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने येथून पुन्हा निवडणूक लढवत आहेत. मात्र आवाडे यांच्या भूमिकेने महायुतीला तडा गेला आहे.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत प्रकाश आवाडे, विनय कोरे, राजेंद्र पाटील-यड्रावकर या महायुती समर्थक तीन आमदारांत बैठका झाल्याने महायुतीत तणाव आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी कोल्हापूर दौर्यावर येत आहेत. ते या दौर्यात डॅमेज कंट्रोल कसे करणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कोल्हापूर किंवा हातकणंगले यापैकी एक जागा भाजपला मिळावी अशी सुरुवातीपासून मागणी करण्यात येत होती. मात्र शिंदे शिवसेनेचे खासदार तेथे असल्याने त्यांना निवडणुकीपूर्वी उमेदवारीचा शब्द दिल्याने विद्यमान खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना
उमेदवारी देण्यात आली.
सुरुवातीला भाजपने हातकणंगले मतदारसंघातून राहुल आवाडे यांच्यासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र माने यांना उमेदवारी जाहीर झाल्याने प्रकाश आवाडे यांनी थेट बंडखोरीचे हत्यार उपसले आहे. आपण भाजपचे सहयोगी आमदार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी या मतदारसंघातून भाजप समर्थक खासदार निवडून गेला पाहिजे हीच आपली यामागे भूमिका असल्याचे आवाडे यांनी सांगितले.
महायुतीत शिंदे शिवसेनेला उमेदवारी मिळाली आहे. मग तुमची भूमिका काय, यावर आवाडे यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींना आपला पाठिंबा हीच आपली भूमिका आणि अजेंडा असल्याचे सांगितले.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत प्रकाश आवाडे, विनय कोरे आणि राजेंद्र पाटील-यड्रावकर या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील भाजप समर्थक तीन आमदारांच्या बैठका झाल्या. त्यामुळे आवाडे यांच्या बंडाला कोरे व यड्रावकर यांची साथ आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
यासंदर्भात कोरे यांनी आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे सांगतील तीच माझी भूमिका राहील, असे दै. 'पुढारी'शी बोलताना सांगितले. आवाडे यांनाही चर्चेवेळी आपण उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी आपण उमेदवारी मागणे योग्य होते. मात्र एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्याबाबत वेगळी भूमिका घेणे योग्य नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, उद्या शनिवार, दि. 13 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौर्यावर येणार आहेत. आपली व त्यांची भेट होणार आहे. या भेटीत हा मुद्दा येऊ शकतो, असेही कोरे यांनी सांगितले.
निरोप आल्यास मुख्यमंत्र्यांना भेटणार : प्रकाश आवाडे
मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार असल्याने व त्याविरुद्ध भाजपच्या सहयोगी आमदाराने बंडाची भूमिका घेतल्याने मुख्यमंत्र्यांच्या दौर्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोल्हापूर दौर्यात मुख्यमंत्री शिंदे आवाडे यांना बोलावून समजूत काढणार का, याची चर्चा आहे. याबाबत आवाडे यांना आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार का, असे विचारले असता याबाबत आपल्याला अद्याप कोणताही निरोप आलेला नाही. निरोप आला तर निश्चितपणे भेटणार, असे त्यांनी सांगितले.