MLA Nitesh Rane : आ. नितेश राणे ‘आयसीयू’त, छातीत वेदना होत असल्याची माहिती

MLA Nitesh Rane : आ. नितेश राणे ‘आयसीयू’त, छातीत वेदना होत असल्याची माहिती

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब हल्लाप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील भाजपचे आमदार नितेश राणे यांची सोमवारी येथील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. छातीत वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना ओरोस (जि. सिंधुदुर्ग) येथून पोलिस बंदोबस्तात कोल्हापुरात हलविण्यात आले. (MLA Nitesh Rane)

परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंसह त्यांचे स्वीय सहायक राकेश परब यांना अटक करण्यात आली. पोलिस कोठडीनंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

शुक्रवारी प्रकृतीचा त्रास होत असल्याची तक्रार केल्यानंतर राणे यांच्यासह परब यांना वैद्यकीय तपासणीसाठी कोल्हापूरला हलविण्यात येणार होते. मात्र, त्याच दिवशी सीपीआरमधील डॉक्टरांच्या पथकाने सायंकाळी सिंधुदुर्गात जाऊन तपासणी केली होती.

MLA Nitesh Rane : तळेरे येथे थांबून रुग्णवाहिकेतच उपचार

राणे यांच्या छातीत वेदना होत असल्याची तक्रार त्यांच्या वकिलांनी सोमवारी सकाळी केली. दुपारी बंदोबस्तात त्यांना कोल्हापूरला हलविण्यात आले. प्रवासात तळेरेनजीक प्रकृतीचा त्रास होऊ लागला. डॉक्टरांनी रुग्णवाहिकेत त्यांच्यावर उपचार केले. सायंकाळी राणेंसह डॉक्टरांचा ताफा सीपीआरमध्ये पोहोचला.

बंदोबस्तासाठी फौजफाटा

खबरदारी म्हणून सीपीआरच्या आवारात शहर पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, वाहतूक पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी, राजेश गवळी यांच्यासह पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

समर्थकांची गर्दी

नितेश राणे यांना कोल्हापुरात आणण्यात येणार असल्याने कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, पंचायत समितीचे सभापती मनोज रावराणे, संतोष कानडे, भाई सावंत, 'स्वाभिमान'चे जिल्हाध्यक्ष सचिन तोडकर, क्षत्रिय मराठा समाजाचे दिलीप पाटील आदी सीपीआरमध्ये उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news