वालचंदनगर : पुढारी वृत्तसेवा: इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार,माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे आपल्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समर्थन देण्यासाठी मुंबईला दाखल झाले आहेत. राज्यातील राजकीय समीकरण बदलत असताना इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी आपल्या राजकीय जीवनातील मैत्री जपत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीच साथ देण्याचा दृढ निश्चय ठेवला असून भरणे अजित पवार यांच्यासोबत ठाम आहेत.
आमदार भरणे हे मंगळवार पासूनच मुंबईला देवगिरी बंगल्यावर ठाण मांडून बसले असून बुधवारी तालुक्यातील शेकडो भरणे समर्थक अजित पवार यांना समर्थन देण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर,प्रतापराव पाटील, तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,सचिन सपकळ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते अजित पवार यांना समर्थन देण्यासाठी गेले आहेत.