पुढारी ऑनलाईन डेस्क : मिझोरममध्ये ४० जागांसाठी आज (दि.४) मतमोजणी होत आहे. मिझोरममध्ये मुख्य लढत झोराम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) आणि मिझो नॅशनल फ्रंट (MNF) यांच्यात होत आहे. १९८४ पासून, मिझोरममध्ये कधी काँग्रेस तर कधी मिझो नॅशनल फ्रंट (MNF) सत्तेत राहीला आहे. १३ मतमोजणी केंद्रे आणि ४० मतमोजणी हॉलमध्ये सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. ७ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते.
सर्व ४० जागांसाठी मतमोजणी सुरू झाली असून सध्या भाजप एका जागेवर आघाडीवर आहे.
एकूण १७४ उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी राज्यातील एकूण ८.५२ लाख मतदारांपैकी ८०.६६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यातील सर्व ११ जिल्ह्यांपैकी सेरछिप जिल्ह्यात सर्वाधिक ८४.७८ टक्के मतदान झाले, त्यानंतर ममित जिल्ह्यात ८४.६६ टक्के, हन्थियाल जिल्ह्यात ८४.१९ टक्के आणि लुंगलेई जिल्ह्यात ८३.६८ टक्के मतदान झाले. १८ महिला उमेदवारांसह एकूण १७४ उमेदवार रिंगणात आहेत.
सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट (MNF), मुख्य विरोधी पक्ष झोरम पीपल्स मूव्हमेंट (ZPM) आणि काँग्रेस यांनी प्रत्येकी ४० जागा लढवल्या, तर भाजपा आणि आम आदमी पार्टी (AAP) यांनी अनुक्रमे २३ आणि ४ जागांवर नशीब आजमावले. २७ अपक्ष उमेदवारही आहेत.
२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत एमएनएफने २६ जागा जिंकल्या होत्या. झेडपीएमला ८ तर काँग्रेसला ५ जागा मिळाल्या होत्या. भाजपने एक जागा जिंकून आपले खाते उघडले होते. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत एमएनएफने आणखी दोन जागा जिंकल्या होत्या.
मिझोराममध्ये विधानसभेच्या एकूण ४० जागा आहेत. यातील एक जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर ३९ जागा एसटीसाठी (अनुसूचित जमाती) राखीव आहेत. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा २१ पार करावा लागणार आहे.
MNF, ZPM आणि काँग्रेसने सर्व ४० जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. भाजपचे २३, आम आदमी पार्टीचे ४ आणि २७ अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.