दुबई; वृत्तसंस्था : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज ने मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) महिला एकदिवसीय रँकिंगमध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे.
न्यूझीलंडची एमी सॅटरथवेटने अव्वल पाच जणांमध्ये पुनरागमन केले आहे. मिताली राज चे 762 रेटिंग गुण आहेत. या आधी अव्वल दहामध्ये स्मृती मानधनाही असून, ती सातव्या स्थानी आहे.
इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाबाद 79 धावांची खेळी करणार्या सॅटरथवेटने अव्वल पाच जणांमध्ये पुनरागमन केले. गेल्या आठवड्यातील क्रमवारीत मितालीसोबत संयुक्तपणे अव्वल स्थानी असणारी दक्षिण आफ्रिकेची सलामी फलंदाज लिजेल ली ताज्या क्रमवारीत दुसर्या स्थानी आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या दोन एकदिवसीय सामन्यातून बाहेर गेल्याने तिचे रेटिंग गुण कमी झाले. तर, इंग्लंडची कर्णधार हीथर नाईटला पाच स्थानांचा फायदा झाला आहे. अनुभवी भारतीय गोलंदाज झुलन गोस्वामी एका स्थानाच्या फायद्यासह चौथ्या स्थानी पोहोचली आहे. तर, फिरकीपटू पूनम यादव गोलंदाजांमध्ये नवव्या स्थानी कायम आहे.