सुदानमध्ये मृत्यूचे भय; आम्हाला मायदेशी न्या!

सुदानमध्ये मृत्यूचे भय; आम्हाला मायदेशी न्या!
Published on
Updated on

इस्लामपूर; अशोक शिंदे : वाळवा तालुक्यासह सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांनी नातेवाईकांकडे मृत्यूच्या भयाने मदतीची याचना केली आहे. लष्कर व निमलष्कर दलामधील सशस्त्र संघर्षामध्ये अनेकांचा बळी जात असून भारतीय नागरिक मृत्यूच्या भयाखाली आहेत. वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी, गोटखिंडी, आष्टा, येलूर येथील काहीजण तिकडे अडकल्याची माहिती मिळत आहे.

सुदानमध्ये लष्कर व निमलष्करी दलामध्ये गेल्या काही दिवसातील सशस्त्र संघर्षात आत्तापर्यंत 400 हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. हजारो लोक जखमी झाले आहेत; असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. या संघर्षग्रस्त सुदानमध्ये सांगली, सातारा व कोल्हापूर परिसरातील 100 हून अधिक कामगार अडकल्याची प्राथमिक माहिती आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कामगार सुदानमधील एका शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये गेल्या सहा महिने ते एक वर्षापासून कामावर आहेत.

वाळवा तालुक्यातील नातेवार्ईकांकडे गेल्या चार दिवसांपासून सतत संपर्क केला जात आहे. त्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार; काही दिवसापासून सुदानची राजधानी खार्तुममध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे अनेक स्थानिक नागरिकांचा बळी गेला आहे. एक कंपनी ही खार्तुमपासून 400 किलोमीटर अंतरावर असून कंपनीच्या परिसरातदेखील लष्कर व निमलष्करी दलात संघर्ष सुरू झाल्याचे समजते.

शुगर कंपनीत काम करणार्‍या भारतीय कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार खार्तुममधील बँकातून चालतात. मात्र संघर्षाच्या परिस्थितीमुळे खार्तुममधील बँकांचे व्यवहार बंद असल्याने कामगारांच्या वेतनाचा व त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच कंपनीच्या बाहेरील बाजारपेठा तणावामुळे बंद असल्याने कामगारांना गरजेच्या वस्तू देखील मिळत नाहीत. याशिवाय इंटरनेट यंत्रणा वारंवार बंद असल्याने या कामगारांचा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क होत नसल्याने कामगार व त्यांचे कुटुंबिय तणावाखाली आहेत.

सुदानमध्ये अडकलेल्या कामगारांनी तेथील भारतीय दूतावासाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय दूतावास सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम करीत आहेत. परंतु एक शुगर कंपनी या ठिकाणापासून 1200 किलोमीटर अंतरावर असून तेथे पोहोचणे सुरक्षेच्या कारणामुळे शक्य नाही. कामगार सरासरी 30 ते 45 या वयोगटातील असून येडेनिपाणी, पाडळी, गोटखिंडी, नागठाणे, इचलकरंजी, इस्लामपूर, सातारा, तासगाव, फाळकेवाडी, गडहिंग्लज, इचलकरंजी, येलूर, बागणी, आष्टा, दुधगाव, येलूर येथील आहेत.

सुटकेसाठी प्रयत्न हवेत

फ्रान्स, अमेरिका, भारत या देशासह इतर देशातील तेथील नागरिकांना विमानामधून, जहाजामधून आपापल्या देशात आणण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु अजूनही मृत्यूच्या भयाखालील कामगारांच्या सुटकेचे काम युद्धपातळीवर गतीने होण्याची गरज आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने विचार करून त्यांच्या सुटकेसाठी केंद्रीय पातळीवरील परराष्ट्र खाते व पंतप्रधान कार्यालयात प्रयत्न करावेत, अशी मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news