तळ्यात मळ्यात भूमिका शरद पवारांना घातक ठरली ! : छगन भुजबळ

तळ्यात मळ्यात भूमिका शरद पवारांना घातक ठरली ! : छगन भुजबळ
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांना सोबत घेत दिल्लीत बैठका घेऊन भाजपबरोबर जाण्याचे अनेकदा ठरले. मात्र, ऐनवेळी माघार घेत आमच्या सारख्या नेत्यांच्या मनात संभ्रम निर्माण केला गेला. शरद पवारांच्या तळ्यात मळ्यात भूमिकेला एकदाचा सोक्षमोक्ष लावायचाच, अन् होईल ते होईल असे म्हणत आम्ही सत्तेत सामील होण्याचा निर्णय घेतला. पवारांना हीच भूमिका घातक ठरली असल्याचे मत छगन भुजबळ यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

शरद पवारांनी नाशिकमध्ये म्हणजे ओबीसी नेत्याच्या मतदारसंघात सभा घेण्यामागे उद्देश काय असा सवाल भुजबळांनी केला होता. पवारांनी माझ्या घरात येऊन ओबीसींना धक्का लावला असला तरी मी माझे व ओबीसींचे ऊर्जा स्थान असलेल्या फुले वाड्यात येऊन उत्तर दिले आहे, असे म्हणत भुजबळ यांनी पवारांना प्रतिउत्तर दिले. ते पुढे म्हणाले, मी विचारधारा बदलली नसून ज्यांनी फुलेंचा अपमान केला ते आता सत्तेतून पायउतार झाले आहेत. बेरजेचे की तडजोडीचे राजकारण करणार या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, ज्या ज्या पक्षात होतो, त्यांच्याकडून जबाबदारीने कामे करून घेतली.

त्याचाच बदला म्हणून पहाटेचा शपथविधी…

शरद पवारांनी तुमचा विश्वासघात केला का? या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी घडलेल्या घडामोडीला पवारच जबाबदार असून २०१४ पासून भाजप सोबत जाण्याची भूमिका घेत होते. त्यानुसार आम्ही सर्व नेते ते सांगतील तिथे बसत होतो. मात्र, शेवटच्या क्षणी ते निर्णय बदलत होते, याचाच आम्हा नेत्यांना कंटाळा आला होता. पवारांच्या भूमिकेचा बदला म्हणून अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी सोहळा केला होता, असेही भुजबळ यांनी सांगितले. परवा झालेला शपथविधी हा काही ऐनवेळी निर्णय घेतलेला नव्हता. हे घडल्यानंतर शरद पवारांनी जो निलंबनाचा निर्णय घेतला आहे, त्या कायदेशीर प्रक्रियांना आम्हीही उत्तर देऊ असेही त्यांनी सांगितले.

भुजबळ भडकले

पत्रकारांनी फुले वाड्यात भुजबळ यांना घेरल्यानंतर त्यांनी मी राजकीय काहीच भाष्य करणार नाही, असे म्हणत पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाड्याच्या बाहेर बोलू शकता, असे म्हणत अखेर पत्रकारांनी त्यांना घेरलेच. प्रश्नांचा होणारा भडीमार आणि शरद पवार विषयी घेतलेली भूमिका या विषयावर ते पत्रकारांवरच भडकले. अखेर स्वतःला सावरत मी काही पळून जाणार नाही. सर्वांच्या प्रश्नांना उत्तर देईल असे म्हणत पत्रकारांना सामोरे गेले. असे असले तरी त्यांनी एकाही प्रश्नाला थेट उत्तर न देत गोलमाल भूमिका घेतली.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news