किचकट अटींची पूर्तता करताना दूध उत्पादकांची दमछाक

किचकट अटींची पूर्तता करताना दूध उत्पादकांची दमछाक

वाल्हे : मागील काही महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकरीवर्गाकडून दूध दरवाढीसाठी अनेक आंदोलने, उपोषणे करण्यात आली. यानंतर मागील महिन्यात शासनाने दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले होते. मात्र, किचकट अटींमुळे दूध उत्पादक शेतकरी फेर्‍या मारून वैतागले आहेत. अनेक शेतकरी या अनुदानापासून वंचित राहण्याची भीती आता व्यक्त होत आहे. शासनाकडून घोषित करण्यात आलेल्या प्रतिलिटर पाच रुपये अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकर्‍यांना आपल्या पशुधनाची माहिती संबंधित दूध संघ, दूध संस्था यांना जमा करावयाची आहे. शासनाने अनुदान थेट दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खाती वर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी दूध उत्पादक सभासद ज्या संस्थेस पुरवठा करीत अशा दूध उत्पादकांकडून सर्व कागदपत्रांची पूर्तता दूधसंकलन केंद्रचालकांनी करून देऊन संघास सादर करावी लागत आहे.

दूध उत्पादक शेतकर्‍यांचे नाव, बँकेचे नाव (आधार कार्डशी लिंक असलेले), शाखा, खाते क्रमांक, कोड तपशीलवर माहितीसोबत बँक खातेपानांची छायांकित प्रत व आधार कार्ड छायांकित प्रत, दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या पशुधनांची संख्या, आधार कार्डशी लिंक असलेल्या पशुधनसंख्येपैकी एअर टॅग केलेली पशुधनसंख्या व एअर टॅग क्रमांक, पशुधनसंख्यांपैकी एअर टॅग न केलेल्या पशुधनसंख्येची नोंद नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात करून एअर टॅग करून घेण्याची दूध उत्पादकांना सूचना करावी लागत आहे. हे सर्व ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर असल्याने पशुपालक हैराण होत आहेत.
प्रामुख्याने एअर टॅग हा मुद्दा अतिशय किचकट ठरत आहे. बहुतांश शेतकऱ्यांचे गोठे हे माळरानावर असल्याने तेथे मोबाईलला रेंज नसते. अशा ठिकाणी गायीला एअर टॅग करणे अतिशय जिकिरीचे ठरत आहे. परिणामी, असे दूध उत्पादक अनुदानापासून वंचित राहण्याची दाट शक्यता आहे.

एअर टॅग म्हणजे काय?
एअर टॅग म्हणजे गायींच्या कानाला लावण्यात येणारा पिवळा टॅग, ज्याला एक क्रमांक असतो. हा क्रमांक म्हणजे गायींचा आधार क्रमांक, ज्यामध्ये गायीची जात (बि—ड), टॅग नोंद होतानाचे वय, सोबत गायीच्या मालकाचे नाव व मोबाईल क्रमांक, अशी सर्व माहिती असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news