मिकी माऊस आणि डिस्नेचा संबंध संपुष्टात

मिकी माऊस आणि डिस्नेचा संबंध संपुष्टात
मिकी माऊस आणि डिस्नेचा संबंध संपुष्टात

वॉशिंग्टन : लहान मुलांच्या भावविश्वात अनेक काल्पनिक पात्रेही असतात. गेल्या अनेक दशकांपासून मिकी माऊसने या विश्वात अढळ स्थान मिळवलेले आहे. काळ बदलला, पिढ्याही बदलल्या, लहान मंडळी मोठी झाली, मोठी वयोवृद्ध. पण कार्टूनवरील आणि त्यातही डिस्नेच्या कार्टूनवर असणारं प्रेम काही कमी झालं नाही. त्यामध्येही मिकी माऊस आणि त्याच्यासोबत दिसणारी मिनी अनेकांची लाडकी. जवळपास 95 वर्षांपासून डिस्नेच्या सोबत असणारा हा मिकी आणि मिनी आता मात्र डिस्नेपासून दुरावणार असून, इथून पुढं डिस्नेचा त्यांच्यावर कोणताही हक्क राहणार नाही.

'स्टीमबोट विली' या 1928 मधील लघुपटामध्ये मिकी आणि मिनी पाहायला मिळाले होते. हा तोच क्षण होता, जिथून डिस्नेचं नशीब खर्‍या अर्थानं फळफळलं आणि सिनेमा जगतात एक नवा अध्याय सुरू झाला. पाहता पाहता याच मिकी माऊसनं डिस्नेच्या खात्यात दर वर्षाला तब्बल 50 हजार कोटींचा गल्ला जमवून दिला. 1928 मधील हेच मिकी आणि मिनी फक्त डिस्नेपुरताच सीमित राहणार नसून ते अमेरिकेतील नागरिकांना सहजपणे वापरता, नव्यानं त्यांच्या लूकवर काम करता येणार आहे.

डिस्नेचा त्यांच्यावर असणारा स्वामित्व हक्क अर्थात कॉपीराईट कालावधी संपल्यामुळं आता हा मिकी आणि त्याच्यासोबत असणारी मिनी फक्त डिस्नेची नसून खर्‍या अर्थाने सर्वांचे झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात कार्टूनिस्ट मिकीच्या या जुन्या आणि 95 वर्षांच्या लूकवर काम करू शकणार आहेत. किंबहुना कोणीही मिकी आणि मिनीच्या कार्टूनचा वापर अगदी मोफत करू शकणार आहेत. डिस्नेकडून मिकी आणि मिनीच्या सर्वात पहिल्या व्हर्जनवरील कॉपीराईट सोडण्यात आले असले तरीही त्यांची आधुनिक रूपे अर्थात कार्टूनचे नवे व्हर्जन मात्र कॉपीराईटचा विषय राहणार असून, त्यांच्यावर फक्त डिस्नेचाच अधिकार असेल असंही कंपनीनं स्पष्ट केलं आहे.

अमेरिकेतील स्वामित्व हक्क कायद्यानुसार एखाद्या पात्रावर 95 वर्षांसाठी हक्क सांगता येतो. म्हणजेच 'स्टीमबोट विली' एक जानेवारी 2024 रोजी कायदेशीररीत्या सार्वजनिक मालमत्ता म्हणून सर्वांसाठी उपलब्ध झाला असून आता त्यातील काम कायदेशीररीत्या कोणीही सादर, शेअर, वापर करू शकतं. मिकी आणि मिनीसोबतच अमेरिकेतील जनतेसाठी आता चार्ली चॅप्लिन यांचा सायलेंट रोमँटिक कॉमेडी 'सर्कस', इंग्रजी पुस्तक 'द हाऊस अ‍ॅट पूह कॉर्नर' असं साहित्यसुद्धा कायदेशीररीत्या उपलब्ध असेल. डिस्ने आणि जुना मिकी यांच्यामध्ये दुरावा आला असला तरीही तो कंपनीचा ट्रेडमार्क असून, 'कार्पोरेट मॅस्कोट' कायम राहणार आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी त्याचा वापर मर्यादित असेल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news