पिंपरी: ‘म्हाडा’ने अडवले गोरगरिबांचे पैसे? घराचे स्वप्न भंगले; अनामत रक्कमही अडकली

पिंपरी: ‘म्हाडा’ने अडवले गोरगरिबांचे पैसे? घराचे स्वप्न भंगले; अनामत रक्कमही अडकली

नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी : हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शहरातील मध्यमवर्गीय व गोरगरीब नागरिकांनी म्हाडाकडे अर्ज करून अनामत रक्कम भरली खरी; मात्र लॉटरी न लागल्याने त्यांचा स्वप्नभंग झाला, शिवाय अनेकांची अनामत रक्कमही दोन महिन्यांपासून अडकली आहे. हजारो नागरिकांची अनामत रक्कम परत न देता म्हाडा त्याचा वापर कसा करत आहे, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ अर्थात पुणे 'म्हाडा'च्या वतीने 5211 घरांसाठी नऊ जूनपासून ऑनलाईन नोंदणी व अर्ज मागविण्यात आले. 28 ऑगस्टला 'लकी ड्रॉ' काढण्यात आला; मात्र सोडतीत घरे न मिळालेल्या लोकांना 'म्हाडा'ने अद्याप अनामत रक्कम परत केलेली नाही.

5211 घरांपैकी, 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत, म्हाडाची लॉटरी पुणे 2022 तर्फे 2088 घरे देण्यात येणार आहेत. म्हाडाच्या पुणे लॉटरी 2022 मध्ये 20 टक्के योजनेतील घरे खासगी विकासकांनी बांधलेल्या इमारतींमध्ये असतील. लहान गटांसाठी उपलब्ध घरे 320 ते 430 चौरस फूटदरम्यान आहेत. म्हाडाच्या या लॉटरी पुण्यातील घरे बाणेर, फुरसुंगी, कसबा पेठ, केशवनगर, खराडी, लोहगाव, मामुर्डी, महंमदवाडी, मुंढवा, पाषाण, पुनावळे, ताथवडे, थेरगाव, वडमुखवाडी, वाघोली, वाकड आणि येरवडा या भागात असतील. 2845 घरे प्रथम प्राधान्यक्रमानुसार उपलब्ध करून दिली जाणार असून, 279 घरे म्हाडा बोर्डाच्याअंतर्गत विविध योजनांतर्गत दिली जाणार आहेत.

5,211 घरांसाठी, म्हाडाच्या योजनेसाठी 90,081 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 71,742 अर्जदारांनी आधीच अनामत रक्कम भरली होती. कमी उत्पन्न गटासाठी प्रत्येकी 5 हजार तर इतरांसाठी 10 हजार रुपये अनामत रक्कम भरणे गरजेचे होते. या घरांसाठी नऊ जून 2022 रोजी रजिस्ट्रेशन सुरू झाले ते 31 जुलै 2022 रोजी संपले. ऑनलाईन अर्ज 10 जूनला सुरू झाले. एक ऑगस्टला ते संपले. ऑनलाईन पेमेंटची मुदत दोन ऑगस्टला संपली. 18 ऑगस्ट 2022 रोजी लकी ड्रॉ काढण्यात आला.

त्यात घरे न मिळालेल्या लोकांना पैसे परत करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. लकी ड्रॉ योजनेत अर्ज केलेल्यांना 28 ऑगस्टपासून रिफंड करण्यात येत आहे. तर 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व' मध्ये अर्ज केलेल्यांना एक सप्टेंबरपासून रिफंड केला जात आहे, असे सांगण्यात आले; मात्र म्हाडाच्या संकेतस्थळावर बघितले असता, रनिंग असे दाखविण्यात येत आहे. प्रत्यक्षात नागरिकांना आपली अनामत रक्कम परत मिळालेली नाही. हक्काचे घर झाले तर नाहीच, वर अनामत रक्कम सणासुदीला अडकून पडल्याने नागरिक अस्वस्थ आहेत. घर न मिळालेल्यांना 'म्हाडा' पैसे परत कधी करणार, असा सवाल केला जात आहे.

सोडतीत नंबर न लागलेल्यांना आठ दिवसांतच रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा दावा म्हाडाने केला आहे. ज्यांचे बँक खाते नंबर किंवा आयएफएससी कोड नंबर चुकीचे असतील, त्यांनाच पैसे परत मिळाले नसावेत, असे म्हाडा प्रशासनाच्या वतीने 'पुढारी'शी बोलताना सांगण्यात आले; मात्र 'म्हाडा'ला पैसे पोहोचले कसे, असा प्रश्न लाभार्थी करत आहेत.

म्हाडाच्या घरांसाठी सोडत काढण्यात आली. सोडतीत नंबर न लागलेल्यांना आठ दिवसांतच रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ती जवळजवळ संपली आहे. ज्यांचे खाते नंबर किंवा बँकेचे आयएफएससी कोड नंबर चुकले असतील, त्यांना पैसे मिळाले नसावेत. अशा लोकांची संख्या ही दोन हजार असेल. अनामत रक्कम मिळाली नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यास, त्या अर्जदारांना अनामत रक्कम परत केली जाईल.
– नितीन माने, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हाडा , पुणे

पुणे म्हाडाच्या वतीने 5211 घरांसाठी नऊ जूनपासून ऑनलाईन नोंदणी व अर्ज मागविण्यात आले. 28 ऑगस्टला लकी ड्रॉ काढण्यात आला. सोडतीत घरे न मिळलेल्यांना अनामत रक्कम परत करणे गरजेचे होते; मात्र दोन महिने झाले तरी अद्यापही रक्कम म्हाडाने परत केलेली नाही. हा घरे न मिळालेल्या अर्जदारांवर दुहेरी अन्याय आहे. आम्ही अर्ज केला, अनामत भरली पण अद्याप ती परत मिळालेली नाही.
– प्रतीक्षा सावरकर (प्राधिकरण, आकुर्डी),
– रेश्मा बोबडे (भोसरी, पुणे)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news