पुढारी ऑनलाईन डेस्क : मेघालय विधानसभा निवडणुकीसाठी ( Meghalaya Election ) मतदान पार पडलं आणि त्यानंतर एक्झिट पोलही जाहीर झाले. राज्यात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नाही, असा दावा एक्झिट पोलमध्ये करण्यात आला आहे. मात्र संगमा यांच्या नेतृत्त्वाखालील नॅशनल पीपल्स पार्टीला ( एनपीपी ) सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यानंतर 'एनपीपी'चे प्रमुख कॉनराड संगमा यांनी केलेल्या विधानामुळे राज्यात नव्या आघाडीचे संकेत मिळत आहेत. जाणून घेवूया मेघालयातील सध्याच्या राजकीय समीकरणांविषयी…
मागील निवडणुकीनंतर कॉनराड संगमा यांनी भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले होते. मात्र यंदा दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणुका लढवली होती. एक्झिट पोल जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना 'एनपीपी'चे प्रमुख कॉनराड संगमा म्हणाले की, राज्यात स्थिर सरकार स्थापनेसाठी आम्ही सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. आमच्या पक्षाला मागील निवडणुकीपेक्षा यंदा अधिक जागा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यांनी सर्व पर्याय असे म्हटले आहे. त्यामुळे संगमा हे काँग्रेसबरोबर हातमिळवणी करतील, कारण त्यांनी विधानसभा निवडणूक स्बळावर लढवली होती. असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
मेघालय विधानसभा निवडणुकीत नॅशनल पीपल्स पार्टीला ( एनपीपी ), भाजप, काँग्रेस, तृणमूल काँग्रेसह १३ राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात होते. ३७५ उमेदवारांच्या भविष्याचा फैसला उद्या स्पष्ट होणार आहे. यामध्ये ३६ महिला उमेदवार आहेत. राज्यात भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी ६० उमेदवार उभे केले होते. तर तृणमूल काँग्रेस ५६ मतदारसंघात नशीब अजमावत आहेत.संगमा यांच्या नेतृत्वाखालील एनपीपीने ५७ , युडीपीने ४६, एनचएसपीडीपीने ११, पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंटने ९ तर गण सुरक्षा पार्टीने एक, गारो नॅशनल कौन्सिल दोन, जनता दल (युनायटेड) तीन उमेदवार उभे केले होते. एका जागेवरील उमेदवाराचा मृत्यू झाल्याने राज्यात ६०पैकी केवळ ५९ जागांवर मतदान झाले आहे. अशा स्थितीत या ५९ जागांचे निकालही लागतील. उर्वरित जागेवर नंतर पोटनिवडणूक होणार आहे.
मेघालयमध्ये ६० विधानसभा मतदारसंघापैकी बहुमतांसाठी ३१ जागा जिंकणे आवश्यक आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. काँग्रेसचे २१ उमेदवार विजयी झाले, तर संगमांच्या 'एनपीपी'चे २० उमेदवार विजयी झाले होते. मात्र, काँग्रेसला सर्वात मोठा पक्ष होऊनही सत्तेबाहेर राहावे लागले. भाजपसह इतर काही पक्षांनी 'एनपीपी'ला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते. आता विधानसभा निवडणूक निकालानंतर संगमा कोणती भूमिका घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :