Measles Disease : कोरोना महामारीमुळेच गोवरचा विस्फोट, काय सांगताय तज्ज्ञ?

Measles Disease : कोरोना महामारीमुळेच गोवरचा विस्फोट, काय सांगताय तज्ज्ञ?
Published on
Updated on

नाशिक : सतीश डोंगरे
कोरोना महामारीने थैमान घातल्यानंतर आता गोवर हा संसर्गजन्य आजाराचा विस्फोट होताना दिसत आहे. मुंबईत गोवरचा अक्षरश: उद्रेक झाला असून, आता मालेगावात एकापाठोपाठ रुग्ण आढळून येत आहे. चिंताजनक बाब म्हणजे नाशिकमध्येही लक्षणे आढळून आलेली काही रुग्ण समोर आल्याने, नाशिककरांच्या चिंतेत भर पडली आहे. कोविड काळात लसीकरणात पडलेला खंड हे या आजाराचा उद्रेक होण्यामागचे प्रमुख कारण आहे. वास्तविक पाहता हिवाळ्यात या आजाराचे रुग्ण आढळून येतातच. परंतु, कोविडमुळे लसीकरणात मोठा खंड पडल्याने या आजाराचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

लहानग्यांना विळख्यात घेणारा गोवर हा संसर्गजन्य आजार असून, 'पॅरामिक्सो' व्हायरसमुळे हा आजार होतो. हा विषाणू सर्वप्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करीत असल्याने, लहानग्यांसाठी तो सध्या जीवघेणा ठरत आहे. वास्तविक पाहता, आजच्या स्थितीला हा आजार सामान्य आहे. मात्र, लसीकरण न झाल्याने, या आजाराची तीव—ता समोर येत आहे. सध्या मुंबईमध्ये या आजाराचे असंख्य रुग्ण आढळून येत असून, पाठोपाठ मालेगावातही या आजाराने चांगलेच डोके वर काढले आहे. ही बाब नाशिककरांसाठी चिंतेची असून, पालकांनी आपल्या चिमुकल्याला 9 ते 18 महिन्यांच्या कालावधीत गोवरची लस दिली काय, याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर हा आजार अस्वच्छतेशी निगडित असून, प्रत्येकानेच स्वच्छतेबाबतची पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे.

तत्काळ लस घ्या…

मिसल्स, मम्प्स आणि रुबेला म्हणजे गोवर आणि गालगुंड यांवरची लस तसेच व्हेरिसेला म्हणजे कांजण्यांवरची लस भारतात लहानपणी दिल्या जाणार्‍या लशींचा भाग आहे. पण, ज्यांना ही लस मिळालेली नाही त्यांनी तत्काळ ही लस घ्यावी, जेणेकरून गोवरपासून बचाव करता येईल.

अशी घ्या काळजी

गोवरची लक्षणे दिसून आल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 'व्हिटॅमिन ए' चे सेवन करा.
घरच्या घरी उपचार किंवा आजार अंगावर काढू नका.
मुलांना लक्षणे असल्यास शाळेत किंवा इतर कुठेही गर्दीच्या ठिकाणी घेऊन जाऊ नका.

गोवरचे लक्षणे 7 ते 14 दिवसांत दिसून येतात.

104 अंशांपर्यंत उच्च ताप, अशक्तपणा, खोकला, वाहती सर्दी, लाल डोळे किंवा पाणीदार डोळे होणे.
सुरुवातीला 2 ते 3 दिवसांत तोंडात लहान पांढरे डाग तयार होणे.
3 ते 5 दिवसांत शरीरावर लाल-चपटे पुरळ दिसू लागणे.
गोवरची पुरळ मुलाच्या चेहर्‍यावर, मानेवर, हातांवर, पायांवर, तळव्यांवर येऊ शकतात.

लिंबाचा पाला वापरुन उपचार करु नका

गोवर या आजारावर उपचार म्हणून काही जण लिंबाचा पाला वापरतात. लिंबाच्या पाल्यावर मुलांना झोपवले जाते. मात्र, अशा प्रकारचे घरगुती उपचार मुलाच्या जीवावर बेतू शकतात. गोवरमुळे न्यूमोनिया होण्याची शक्यता असल्याने, अशा प्रकारचे घरगुती उपचार न करता तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

शाळा सुरू झाल्याने धोका

नाशिक शहरात अद्यापपर्यंत गोवरने शिरकाव केला नसला तरी, मालेगावमध्ये गोवरचे रुग्ण वाढू लागल्याने, नाशिककरांची चिंता वाढली आहे. अशात शाळांमधून गोवरचा सर्वाधिक संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या नाशिक शहरात गोवरचा रुग्ण नसल्याने अजून तरी पालकांना चिंता करण्याची गरज नाही.

कोविड काळात लसीकरणच झाले नसल्याने गोवरचा विस्फोट होताना दिसत आहे. लहानग्यांचे प्रामुख्याने 9, 15 आणि चार ते साडेचार महिन्यांच्या काळात लसीकरण होणे गरजेचे आहे. परंतु, कोविड काळात हे होऊ शकले नाही. वास्तविक हिवाळ्यात गोवरचे रुग्ण आढळून येणे सामान्य बाब आहे. मात्र, लसीकरण न झाल्याने ते मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्याचबरोबर आजच्या घडीला गोवर हा जीवघेणा आजार नाही. केवळ वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे.
– डॉ. अमोल मुरकुटे, बालरोगतज्ज्ञ

लसीकरण हा सर्वांत महत्त्वाचा भाग असून, कोविड काळात लसीकरणात खंड पडल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवरचा उद्रेक होताना दिसत आहे. पालकांनी सतर्कता बाळगण्याची गरज असून, आपल्या पाल्याला काही लक्षणे आढळून आल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची गरज आहे. लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असून, पालकांनी त्यावर भर द्यायला हवा.
– डॉ. कविश मेहता, बालरोगतज्ज्ञ

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news