मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे दुसरे पर्व, सुरांची जुगलबंदी होणार

मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद
मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे दुसरे पर्व सुरू होणार आहे.

स्टार प्रवाहवर सुरु होतंय गाण्याचं दुसरं पर्व अर्थातच 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'. पहिल्या पर्वाला मिळाल्या उदंड प्रतिसादानंतर आता नवे छोटे उस्ताद सुरांची मैफल घेऊन सज्ज झालेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले ४ ते १४ या वयोगटातील छोटे उस्ताद आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणार आहेत.

या कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे पहिल्या पर्वातील लोकप्रिय स्पर्धक म्हणजेच शुद्धी, सायली, सार्थक, सिद्धांत आणि स्वरा या पर्वात छोट्या उस्तादांना आपल्या सुरांची साथ देणार आहेत. सुरांचा दरबार हे यंदाच्या पर्वाची खास थीम असल्यामुळे कार्यक्रमातील भव्यता प्रेक्षकांना प्रोमोपासूनच अनुभवायला मिळणार आहे.

या कार्यक्रमाविषयी सांगताना सचिन पिळगावकर म्हणाले, 'छोटे उस्तादचं पर्व पुन्हा एकदा भेटीला घेऊन येतोय. पुन्हा एकदा माझे साथी अर्थातच वैशाली आणि आदर्श एकत्र येऊन छोट्या बालगोपालांना नव्या पद्धतीने लोकांसमोर आणणार आहोत. एक दिशा देण्याचा प्रयत्न ज्या वयात हवा असतो त्या वयात या मुलांना योग्य दिशा मिळणार आहे याचा आनंद आहे.'

वैशाली सामंत म्हणाली, 'छोट्या दोस्तांसोबतचा हा सुरांचा प्रवास अनुभवण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे. गेल्या पर्वाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. लहान वयात जे शिकवलं जातं ते मनात कायमचं कोरलं जातं. आपल्या ज्ञानाचा नव्या पीढीला फायदा होतोय याचा आनंद आहे. या पर्वाचं वेगळेपण म्हणजे संगीताचा दरबार. आपल्या प्रत्येकालाच राजा-राणीच्या गोष्टींमध्ये हरवून जायला आवडतं. गोष्टीतला हा दरबार या पर्वाच्या निमित्ताने सत्यात उतरणार आहे. या मंचावर येणारा प्रत्येक स्पर्धक खूपच स्पेशल आहे आणि त्यामुळेच दरबारात गायल्याचा आनंद छोटे उस्तादचा मंच देणार आहे.'

मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद पर्व दुसरे १० जूनपासून सुरू होणार.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news