जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रविवारी (दि. 21) कुलदैवत श्री खंडोबाचे सहकुटुंब दर्शन घेतले. शिवसेनेच्या लढाईस यश मिळू दे, अशी प्रार्थना त्यांनी खंडेरायाच्या चरणी केली. अंबादास दानवे यांचे चिरंजीव धर्मराज व रश्मी यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. नवदाम्पत्याने मल्हारी मार्तंड यांच्या चरणी नतमस्तक होण्याची परंपरा आहे. या परंपरेचे पालन करीत दानवे कुटुंबीयांनी जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन घेतले. दानवे परिवाराने कुलधर्म कुलाचारानुसार तळी-भंडारा करून भंडार्याची उधळण केली. या वेळी दानवे यांनी 42 किलो खंडा तलवार उचलून शक्तीचे प्रदर्शन केले.
शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, महिला आघाडी जिल्हा संघटक अरुणा हरपळे, युवासेना तालुकाप्रमुख वैभव कोलते, जेजुरी शहरप्रमुख किरण दावलकर, अमित पवार, महेश स्वामी व सुदाम शिनगारे उपस्थित होते. श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने विश्वस्त मंगेश घोणे यांनी दानवे यांचासन्मान केला.