आरोग्य विमा आणि कर सवलतीचे गणित

आरोग्य विमा आणि कर सवलतीचे गणित

आरोग्य विमा हा कर सवलतीसाठी नाही, तर एखादे आजारपण किंवा अपघातात जखमी झाल्यामुळे करण्यात येणार्‍या उपचारात कोणतीही हयगय राहू नये यासाठी काढायला हवा. एकुणातच आरोग्य विमा उतरवताना प्राप्तिकर सवलत किती मिळते, याचा अजिबात विचार करू नये.

कुटुंबाचा आकार, खर्च उचलण्याची क्षमता या आधारावर आरोग्य विमा उतरवू शकता. वैयक्तिक असो किंवा कंपनीने उतरवलेला सामूहिक आरोग्य विमा असो, तो काढणे आवश्यकच आहे. पॉलिसीवर नियमानुसार मिळणारी करसवलत ही आपल्याला अतिरिक्त लाभ देणारी असते. आरोग्य विम्यावर करसवलतीचा कसा लाभ मिळतो, ते पाहू या.

'एचयूएफ'ला मिळते सवलत

प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 डीच्या सवलतीचा लाभ हा व्यक्तिगतरित्या आणि हिंदू अविभक्त कुटुंब (एचयूएफ)लादेखील मिळू शकतो. याशिवाय 80 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तीसाठी बहुतांश कंपन्या आरोग्य विम्याची सुविधा देत नाहीत. आणखी एक गोष्ट म्हणजे कलम 80 डी मध्ये कोणत्याही परिस्थितीत 55 हजारांपेक्षाही अधिक रकमेपर्यंत सवलत घेता येते. पण त्यासाठी एकच अट आहे आणि ती म्हणजे विमाधारक किंवा त्याचे कुटुंबातील सदस्यांचे वय 60 पेक्षा कमी असावे.

कोणाला सवलत मिळत नाही

कलम 80 डीनुसार हेल्थ इन्श्युरन्स उतरविल्यास प्राप्तिकर सवलतीचा हमखास लाभ मिळतो. पण यासाठीही काही अटी आणि नियम आहेत. ज्यांनी पॉलिसीचा हप्ता रोख रूपात भरला असेल तसेच मुले, पालक किंवा आई-वडील किंवा अन्य कोणी नातेवाइकांनी हप्त्याची रक्कम भरली असेल, तर त्यास करसवलत मिळत नाही. शिवाय सामूहिक आरोग्य विम्यापोटी कंपनीकडून भरल्या जाणार्‍या हप्त्यावर करसवलत मिळत नाही.

दुर्मीळ आजारासाठी विशेष करसवलत

प्राप्तिकर कायद्याच्या 'कलम 80 डीडीबी'नुसार पीडित व्यक्ती किंवा त्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या दुर्मीळ आणि गंभीर आजारापोटी हप्ता भरला जात असेल, तर त्यावर कर सवलतीचा लाभ दिला जातो.

दुर्मीळ आजार कोणते?

कलम 80 डीडीबीनुसार करसवलतीचा लाभ देणार्‍या दुर्मीळ किंवा गंभीर आजारांची माहिती घेऊ. यात स्नायू ताणल्याने होणारा मोटार न्यूरोन नावाचा आजार येतो. या आजारात स्नायूला सक्रिय ठेवणारी नर्व्ह सेल्स काम बंद करते. परिणामी मणका आणि मेंदू या सर्व ठिकाणी तंत्रिकातंत्र हळूहळू काम बंद करू लागतात. नर्व्हस सिस्टिम बिघडते. यावर कोणताही उपचार नाही. आणखी एक आजार अटॅक्सियाचा उल्लेख करावा लागेल. हा आजार गतिमंद किंवा न्यूरोलॉजिकलशी संबंधित आहे. (तंत्रिकातंत्र संबंधित आजार) तो शरीरातील एका गटाशी जोडलेला असतो आणि त्याचा परिणाम शरीराच्या हालचाली आणि समन्वयावर होतो.

अटॅक्सियाशी पीडित लोकांना संतुलन, समन्वय, गिळणे, बोलण्यात अडचणी येतात. याशिवाय शिरांशी संबंधित आणखी एक कोरिया नावाचा आजार असून, त्यापोटी केलेल्या खर्चावर करसवलत दिली जाते. या आजाराला बळी पडलेल्या व्यक्तीच्या शरीरात अशा काही हालचाली होतात की, तो स्वत: करत नाही आणि करण्याचीदेखील इच्छा नसते. शिवाय मेंदूशी संबंधित आणखी एक आजार अफासिया किंवा वाचा बसणे होय. या आजारावरील उपचारातदेखील कर सवलत मिळते. अशा प्रकारच्या गंभीर आणि दुर्मीळ आजारांवर पैसे खर्च झाले तर त्यावर 40 हजारांपर्यंत कलम 80 डीडीबीनुसार करसवलत मिळते.

सेक्शन 80 यू म्हणजे काय?

प्रत्यक्षात सेक्शन 80 यू ही दिव्यांगांशी संबंधित आजारावर उपचारापोटी केलेल्या खर्चावर दिली जाणारी करसवलत आहे. फरक एवढाच की, 80 डीडीच्या अंतर्गत दिव्यांग व्यक्ती ज्या व्यक्तीवर अवलंबून आहे, त्याला करसवलत मिळते. त्याचवेळी या कलमात स्वत: दिव्यांग असेल तर स्वत:वरच्या खर्चावरदेखील प्राप्तिकरात सवलत मिळते.

दिव्यांगांच्या उपचारावर खर्चात सवलत

प्राप्तिकर कायदा कलम 1961 च्या सेक्शन 80 डीडीनुसार कोणत्याही कुटुंबातील दिव्यांग सदस्यावर होणार्‍या खर्चावर करसवलत घेण्याचा अधिकार आहे. यासाठी अट एकच आणि ती म्हणजे या कलमानुसार कोणीही दावा केलेला नसावा. ही सवलत विमाधारक, त्याची पत्नी, मुले, पालक, अवलंबून असलेले भाऊ-बहीण यांना मिळू शकते. दिव्यांग असण्याची टक्केवारी 50 पेक्षा अधिक आणि 80 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर कमाल 75 हजारांपर्यंत करसवलत मिळेल. दिव्यांगता 80 टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर 1,25 लाख रुपयांपर्यंतच्या खर्चावर करसवलत मिळते. 80 डीडीनुसार मानसिक आजार, द़ृष्टिदोष, द़ृष्टी गमावणे, ऐकण्यात अडचणी, मेंटल रिटार्डेशन, कुष्ठरोग, स्वमग्नता आदींवर होणार्‍या खर्चांवरदेखील करसवलत मिळते.

अनिल विद्याधर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news