एकेकाळी मंगळावर होते पृथ्वीसारखे ऋतुचक्र

एकेकाळी मंगळावर होते पृथ्वीसारखे ऋतुचक्र

वॉशिंग्टन : पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र. चंद्राबाबत माणसाला बरेच कुतुहल असते. त्याच्यानंतर अधिक कुतुहल आहे ते पृथ्वीचा शेजारी असलेला तांबडा ग्रह मंगळाचे! मंगळावर जगातील अनेक देशांची याने पोहोचलेली आहेत. प्रत्यक्ष मंगळभूमीवरही स्पिरिट, अपॉर्च्युनिटी, क्युरिऑसिटी, पर्सिव्हरन्स यासारखे रोव्हर फिरत आहेत. त्यामधून मंगळाचा विविधांगी अभ्यास केला जात आहे. आता या अभ्यासातून असे दिसून आले आहे की मंगळावर एकेकाळी पृथ्वीप्रमाणेच ऋतुचक्र होते. हिवाळा, उन्हाळा, पावसाळा असे ऋतू मंगळावरही पाहायला मिळत होते. तीन अब्ज वर्षांपूर्वी मंगळावर असे चक्रीय हवामान होते.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की कोरड्या आणि आर्द्रतायुक्त हवामानामुळे जटिल कार्बनिक घटकांसाठी आदर्श स्थिती निर्माण केलेली असावी. त्यांनी जीवनाचे अग्रदूत म्हणून काम केलेलेही असू शकते. संशोधकांनी म्हटले आहे की पृथ्वीच्या विपरित, मंगळ ग्रहावर अब्जावधी वर्षांपूर्वीचे जीवाश्म नदी आणि सरोवरांमध्ये चांगल्या प्रकारे सुरक्षित आहेत. पृथ्वी एक गतिशील ग्रह आहे जिथे टेक्टॉनिक प्लेटस् आहेत. या प्लेटस् सतत हलत असतात व त्यामुळे भूरचनेत उलथापालथी होत असतात. तशी स्थिती मंगळावर नाही.

मंगळ सध्या थंड आणि कोरडाठाक असला तरी एकेकाळी तिथे वाहते पाणी होते याचे पुरावे मिळालेले आहेत. पाण्याचे अस्तित्व हे जीवसृष्टीच्या अस्तित्वाचाही एक महत्त्वाचा पैलू आहे. त्यामुळे एकेकाळी तिथे सूक्ष्म जीवांच्या स्वरूपात का होईना जीवसृष्टी होती का, याचाही शोध घेतला जात आहे. अब्जावधी वर्षांपूर्वी या ग्रहाने आपले बहुतांश वातावरण गमावले. त्यामुळे मंगळाची सध्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news