Marriage Problems : उपवर वरांना गंडे, रोज नवे फंडे : ‘शुभमंगल’ नंतर बघू… आधी व्हा ‘सावधान’ !

Marriage Problems , Youth Marriage
Marriage Problems , Youth Marriage

कोल्हापूर; विशेष प्रतिनिधी : उपवर मुलांना वेगवेगळ्या समाज माध्यमांवरील जाहिरातींच्या माध्यमातून हजारो रुपयांना गंडा घालण्याचे प्रकार वाढले असून, अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. फसगत होऊनही केवळ लग्नाच्या आशेने हजारो लग्नाळू तरुण सापळ्यांमध्ये नव्याने अडकताना दिसत आहेत. सर्व बाबींची खात्री झाल्याशिवाय संबंधितांशी कोणताही व्यवहार करणे धोकादायक ठरत आहे. (Marriage Problems)

आजकाल सर्वच समाजात मुला-मुलींचे गुणोत्तर प्रमाण अतिशय विषम आहे. दरहजारी मुलांच्या प्रमाणात मुलींचे प्रमाण नऊशेपर्यंत खाली घसरलेले दिसत आहे. विवाहयोग्य तरुणींच्या आणि तिच्या पालकांच्या वराकडून आणि वर पक्षाकडून असलेल्या डोंगराएवढ्या अपेक्षांमुळे वयाची चाळीशी गाठली, तरी अनेकांची लग्ने जमेना झाली आहेत. आठ-दहा वर्षे खर्च करून, मुली बघण्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा करून आणि हजारो मुलींच्या घरांचे उंबरठे झिजवूनही मुलांना लग्नासाठी मुलगी मिळणे दुरापास्त होऊन बसले आहे. नेमक्या या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी काही जण सरसावलेले दिसत आहेत. उपवर वरांना जाळ्यात अडकविण्यासाठी या मंडळींनी वेगवेगळी माध्यमे, समाज माध्यमांवर सापळे लावलेले दिसत आहेत. (Marriage Problems)

  • समाज माध्यमातून प्रसिद्ध होणाऱ्या अशा प्रकाराच्या बहुतांश जाहिराती या नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातून येत असल्याचे दिसून येते आणि या जाहिरातींना प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील तरुण फसतात.
  • काही विशिष्ट समाजांमध्ये विवाहयोग्य मुलींचे अतिशय दुर्भिक्ष्य आहे. नेमक्या अशा समाजाला टार्गेट केले जाते. राज्यातील उपवर मुलांची झालेली कोंडी हेरून काही पाताळयंत्री लोकांनी हा लग्नाचा धंदा मांडलेला दिसत आहे.
  • खोलात जाऊन शोध घेतला, तर हा फसवणुकीच्या रकमेचा आकडा कित्येक कोटींत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आपण फसविले गेलो आहोत याची संबंधितांना जाणीव होते. मात्र, तोपर्यंत हजारो रुपये त्या नंबरवर ऑनलाईन पोहोचलेले असतात.

शेतकरी नवरा हेरा गं बाई..!

लग्नाच्या बाजारात आजकाल अजिबातच मागणी नसलेला घटक कोणता असेल तर तो म्हणजे शेतकरी, उपवर शेतकरी मुलाला लग्नासाठी सहजासहजी मुलगी मिळणे महाअवघड होऊन बसलेले आहे. त्यामुळे माध्यमातून प्रसिद्ध केलेल्या बहुतांश फसव्या जाहिरातीमध्ये अगदी आवर्जून 'शेतकरी मुलगा चालेल' असे नमूद केले जाते. त्यामुळे साहजिकच मोठ्या प्रमाणात उपवर शेतकरी मुले या जाहिरातींकडे वळतात आणि लग्नाच्या आशेने हजारो रुपये गमावून बसताना दिसत आहेत. (Marriage Problems)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news