Market Capitalisation BSE listed companies | शेअर बाजारातील तेजीचा वारू उधळला! BSE बाजार भांडवल पहिल्यांदाच ४०० लाख कोटींवर

Market Capitalisation BSE listed companies | शेअर बाजारातील तेजीचा वारू उधळला! BSE बाजार भांडवल पहिल्यांदाच ४०० लाख कोटींवर

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारात तेजीची लाट कायम आहे. जागतिक सकारात्मक संकेतांदरम्यान आज सोमवारी (दि.८) सेन्सेक्सने ३५० हून अधिक अंकांची वाढ नोंदवत ७४,६५८ च्या सर्वकालीन विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. तर निफ्टीने २२,६२३ अंकांचा नवा उच्चांक नोंदवला. आयटी आणि ऑटो शेअर्समधील खरेदीमुळे शेअर बाजाराने मजबूत सुरुवात केली आहे. (Sensex Nifty hit fresh record highs)

बाजार भांडवलात ९ महिन्यांत १०० लाख कोटींची वाढ

दरम्यान, शेअर बाजारातील आजच्या सर्वकालीन उच्चांकामुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलाने प्रथमच ४०० लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला. (Market Capitalisation BSE listed companies) विशेष म्हणजे बीएसई बाजार भांडवलात केवळ ९ महिन्यांत १०० लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

मनीकंट्रोलच्या वृत्तानुसार, बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज ४०० लाख कोटींवर गेले. मार्च २०१४ मध्ये बाजार भांडवल १०० लाख कोटी रुपयांवर होते. त्यानंतर फेब्रुवारी २०२१ मध्ये ते २०० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. जुलै २०२३ मध्ये ते ३०० लाख कोटींवर गेले आणि आता केवळ नऊ महिन्यांनंतर बाजार भांडवलाने ४०० लाख कोटींचा टप्पा पार केला आहे.

अभूतपूर्व तेजीचे कारण काय? कोणत्या क्षेत्रांचे योगदान?

एप्रिल २०२३ पासून बीएसई सूचीबद्ध कंपन्यांनी बाजार भांडवलात एकत्रितपणे १४५ ट्रिलियन रुपयांची वाढ नोंदवली आहे. ही वाढ ५७ टक्क्यांची आहे. मजबूत कॉर्पोरेट कमाई, स्थिर धोरणांमुळे गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झालेली सकारात्मक भावना तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून बाजारात वाढलेला गुंतवणुकीचा ओघ यामुळे बाजारातील तेजीला चालना मिळाली. मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकात अनुक्रमे ६० टक्के आणि ६५ टक्के वाढ दिसून आली. लार्जकॅप सेन्सेक्स निर्देशांकात २८.६ टक्क्यांची वाढ झाली आहे. बाजारातील तेजीत रियल्टी, पीएसयू बँका, ऑटो, एनर्जी, इन्फ्रा आणि फार्मा या क्षेत्रीय निर्देशांक आघाडीवर राहिले आहेत.

सेन्सेक्स, निफ्टी नव्या शिखरावर

सेन्सेक्स आज ७४,५५५ वर खुला झाला. त्यानंतर त्याने ७४,६५८ पर्यंत उच्चांकी वाढ नोंदवली. सेन्सेक्सवर रिलायन्स, एम अँड एम, पॉवर ग्रिड, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर विप्रो, एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये किरकोळ घसरण दिसून येत आहे. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपही तेजीत आहेत.

निफ्टी आज २२,५७८ वर खुला झाला. त्यानंतर त्याने २२,६२३ च्या अंकाला स्पर्श केला. टाटा कन्झ्यूमर, रिलायन्स, एम अँड एम, बीपीसीएल, पॉवर ग्रिड हे शेअर्स सर्वाधिक वाढले. अदानी पोर्टस्, अपोलो हॉस्पिटल हे शेअर्स घसरले आहेत.

भारतीय शेअर बाजाराने ४ एप्रिल रोजी नवीन विक्रमी उच्चांक गाठला होता. पण ५ एप्रिल रोजी तो स्थिर पातळीवर राहिला.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news