राज्यसभेत मराठवाडा : शंकरराव चव्हाण, प्रमोद महाजन, विलासराव, झकेरिया आदी दिग्गजांचे प्रतिनिधीत्व

Marathwada in Rajya Sabha
Marathwada in Rajya Sabha

छत्रपती संभाजीनगर : राज्यसभा निवडणुकीत भाजपने मराठवाड्यातून अशोक चव्हाण, डॉ. अजित गोपछडे यांना संधी दिल्यामुळे राज्यसभा निवडणूक चर्चेचा विषय बनली आहे. महाराष्ट्रातून सरासरी 19 प्रतिनिधी राज्यसभेवर पाठविले जातात. 1952 पासूनचा विचार करता नरसिंगराव देशमुख, भाऊसाहेब वैशंपायन, विनायकराव पाटील, भाई उद्धवराव पाटील, शंकरराव चव्हाण, प्रमोद महाजनांसह मराठवाड्यातील अनेक दिग्गजांनी राज्यसभेत कामगिरी बजावली आहे.

मराठवाड्यातून सध्या डॉ. भागवत कराड, रजनी पाटील, फौजिया खान हे राज्यसभेत आहेत. चव्हाण आणि गोपछडे यांच्यामुळे या प्रदेशाचे आणखी दोन सदस्य सभागृहात दिसतील. शेतकरी, कामकर्‍यांचे नेते, कुलगुरू, उद्योगपती अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना राज्यसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी आतापर्यंत मिळाली आहे.

संसद आणि विधानसभा कार्यान्वित झाल्यानंतर राज्यसभेवर प्रथमच जाण्याचा मान धाराशिवचे नरसिंगराव बलभिमराव देशमुख (1952 ते 54) यांना मिळाला. ते शेकापशी संबधित होते. त्यांच्याप्रमाणेच धाराशिव येथील शेकापचे ज्येष्ठ नेते भाई उद्धवराव पाटील हे 1964 ते 67 या कालावधीत राज्यसभेचे सदस्य राहिले होते.

सदाशिव उर्फ भाऊसाहेब वैशंपायन हे स्वामी रामानंद तीर्थांचे विश्वासू सहकारी. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असणार्‍या वैशंपायन व अन्य सहकार्‍यांनी मवाळांना पाठिंबा देण्याच्या धोरणामुळे हा पक्ष सोडला. पुढे 1960 मध्येे त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना दोन वेळा राज्यसभेची संधी दिली. (1964-70 व 1976-81). दरम्यानच्या काळात (1971-75) महाराष्ट्र विधानपरिषदेचे ते सदस्यदेखील होते.काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील हे वैजापूरचे. पक्षात त्यांचा मोठा दबदबा होता. यशवंतराव चव्हाण हे त्यांना घाबरून असत. विनायकरावांकडे सता नसली तरी ताकद आहे, असे ते म्हणत. 1960 ते 62 अशी दोन वर्ष ते वरिष्ठ सभागृहाचे सदस्य होते. समाजवादी विचारससरणीचे कार्यकर्ते व जनता दलाचे ज्येष्ठ नेते डॉ. बापूसाहेब काळदाते यांना दोन टर्म म्हणजेच 1984 ते 96 राज्यसभेची संधी मिळाली होती. चौफेर वक्‍तृत्वाने जनमाणासावर मोहिनी टाकणारे डॉ. काळदाते हे लोकसभा आणि विधानसभेचे सदस्य म्हणून कार्यरत होते.

चाकूरकर, विलासराव

लोकसभेचे माजी अध्यक्ष व गांधी घराण्याचे निकटवर्ती लातूरचे शिवराज पाटील चाकूरकर हे 2004 मध्ये राज्यसभेवर निवडून गेले होते. तत्पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत रूपाताई पाटील निलंगेकर यांनी त्यांचा पराभव केला होता. चाकुरकरांकडून 1998 च्या निवडणुकीत लोकसभेत पराभव पत्कराव्या लागणार्‍या भाजपचे डॉ. गोपाळराव पाटील यांनीही 2002 ते 2008 या काळात राज्यसभेत प्रतिनिधीत्व केले होते. लातूरचेच प्राचार्य डॉ. जनार्दध वाघमारे यांना 2008 मध्ये राष्ट्रवादीकडून राज्यसभेची संधी मिळाली होती. लातूरचे नेते आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना केेंद्रात घेतल्यानंतर 2009 साली त्यांनी काँग्रेसने राज्यसभेची उमेदवारी दिली होती.

कुलगुरू बनले खासदार

नांदेड जिल्ह्यातून आतापर्यंत शंकरराव चव्हाण, प्राचार्य गो. रा. म्हैसेकर, सूर्यकांता पाटील, विठ्ठलराव जाधव यांना राज्यसभेत जाण्यास मिळाले. शंकररराव यांनी दोन वेळा मुख्यमंत्री, केेंद्रात मनुष्यबळ, गृह, अर्थ आदी विविध खात्यांचे काम सांभाळले आहे. म्हैसेकर हे त्यांच्या जवळचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू राहिलेल्या म्हैसेकर यांना आणीबाणी नंतरच्या निवडणुकीत काँग्रेसने नांदेड लोकसभा मतदारसंघातून उभे केले होते. पण शेकाप नेते भाई केशवराव धोंडगे यांनी त्यांचा पराभव केल्यानंतर शंकरराव चव्हाण यांनी त्यांना काँग्रेसकडून राज्यसभेवर पाठविले. विठ्ठलराव जाधव हे नांदेडचेच. त्यांनी 1982 ते 92 या कालावधीत तर माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी 1986 ते 91 या काळात सभागृहाचे सदस्यपद भूषविले आहे. काँग्रेसचे युवा नेते व राहुल गांधी यांचे सहकारी राजीव सातव हे गुजरातमधून सभागृहात पोहचले.

प्रमोद महाजनांचा ठसा

बीडचे काँग्रेस नेते रामराव आवरगावकर हे 1974 ते 80 या कालावधीत खासदार होते. बीडमधून 1996 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून गेलेल्या रजनी पाटील यांनी वाजपेयी सरकार पडलयानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2013 ते 18 या काळात त्यांना काँग्रेसने राज्यसभेवर पाठविले होते. ही मुदत संपल्यानंतर 2021च्या निवडणुकीत पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी बहाल केली. त्या सध्या राज्यसभेच्या सदस्य आहेत. देशाच्या राजकारणावर आपला प्रभावी ठसा उमटविणारे बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन हे राज्यसभेवर 1986 साली प्रथम निवडून गेले. 1996 ला मुंबई (उतर पश्‍चिम) लोकसभा मतदारसंघातून ते निवडून गेले. 1998 ला पराभूत झाल्यानंतर ते शेवटपर्यंत राज्यभेचे सदस्य होते. विधानपरिषदेचे सदस्य व माजी मंत्री राहिलेल्या परभणीच्या फौजिया खान या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधीत्व करतात.

उद्योगपतींना संधी

छत्रपती संभाजीनगरच्या विकासाचे शिल्पकार असलेले डॉ. रफीक झकेरिया हे 1978 ते 84 तर उर्दू कवी सिंकदर अलि वज्द 1972 ते 78 या काळात राज्यसभेत होते. सुप्रसिद्ध उद्योगपती राजकुमार धूत हे गोविंनदराव आदिक हे नगरचे. परंतू एक निवडचणूक ते वैजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. ते काही काळ राज्यसभेत होते. व्हिडिओकॉनचे मालक व सुप्रसिद्ध उद्योगपती राजकुमार धूत हे छत्रपती संभाजीनगरचे. शिवसेनेशी असलेल्या संबंधामुळे त्यांना 2002 मध्ये राज्यसभेची उमेदवारी मिळाली. तीन टर्म त्यांना सदस्य राहता आले. छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर राहिलेल्या डॉ. भागवत कराड यांना भाजपने एप्रिल 2020 मध्ये वरिष्ठ सभागृहाची उमेदवारी दिली. सध्या त्यांच्याकडे अर्थ खात्याचे रा ज्यमंत्रीपद आहे.

नानाजी देशमुखांना वेतनवान नाकारली

हिंगोली जिल्ह्यातील कडोळीचे रहिवासी असणार्‍या भारतरत्न नानाजी देशमुख यांची कर्मभूमी मात्र उतर प्रदेश राहिली. जनता पक्षाच्या जडणघडणीत जयप्रकाशजी नारायण यांच्यासोबत त्यांचा सहभाग मोठा होता. आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत ते उ. प्र. मधील बलरामपूर मतदारसंघातून निवडून गेले होते. मोरारजी देसाई यांनी त्यांना उ़द्योगमंत्री होण्याची दिलेली ऑफर त्यांनी नाकारली. वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत झाले. पुढे अटलबिहारी वाजपेयी यांच्या आग्रहाखातर ते 1999 ते 2005 या काळात राज्यसभेचे सदस्य झाले. या वेळी खासदारांचे वेतन, भते वाढ करण्याचे विधेयक आले होते. त्यास नानाजींनी विरोध केला. पण हे विधेयक संमत झाल्यानंतर येत असलेली वाढीव रक्‍कम त्यांनी पंतप्रधान निधीला दिली.

पहिली राज्यसभा सर्वानुमते

संसदेची दोन सभागृहे झाल्यानंतर राज्यसभेतील निवडी कशा कराव्यात असा प्रश्‍न उभा राहिला. तेव्हा विधानसभा अस्तित्वाची प्रक्रिया सुरू होती. याबाबत बोलताना धाराशिवचे माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील म्हणाले, की समाजातील विविध क्षेत्रातील मंडळींना सभागृहात घ्यावे आणि त्यांचा कालावधी दोन वर्ष असावा. त्यानंतर लॉट पद्धतीने सदस्यांना बाद करावे व नवीन सदस्य नियुक्‍तीची प्रक्रिया करावी असे ठरले. विधानसभा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईपर्यंत ही पद्धत राबविण्यात आली. 1952 ला धाराशिवचे नेते नरसिंगराव देशमुख यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कर्तृत्व पाहून त्यांना राज्यसभेचे खासदार बन विण्यात आले. ते शेकापचे असले तरी पक्षीय व्देषाची झालर जाणवू दिली नाही. दोन वर्षांनी लॉट मध्ये त्यांचे नाव वगळलेल्या यादीत आले व खासदारकीची संधी हुकली. (निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर मात्र देशमुख यांना दुसरी टर्म मिळाली असा उल्‍लेख आहे.

डॉ. आंबेडकर, सचिन तेंडूलकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यसभा गाजविली. बाबासाहेबांचा आणि छत्रपती संभाजीनगरचे अतूट नाते राहिले आहे. संभाजीनगरात शैक्षणिक संस्थांची उभारणी करून त्यांनी या भागातील विद्यर्थ्यांना महाविद्यालयाची दारे खुली करून दिली. तद्वतच भारतरत्न सचिन तेंडूलकर हे खासदार असताना त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील डोंंजा (ता. परंडा) हे गाव दतक घेतले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news